एमबीबीएस, बीडीएसच्या प्रवेशातून २०० च्यावर विद्यार्थी बाद ! महाराष्ट्र सीईटी सेलने दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 20:39 IST2025-10-30T20:38:30+5:302025-10-30T20:39:55+5:30
Nagpur : राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलने एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या फेरीत राज्यभरातील एकूण १,७६४ रिक्त जागांसाठी प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे.

Over 200 students rejected from MBBS, BDS admissions! Maharashtra CET Cell gives information
नागपूर : राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलने एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या फेरीत राज्यभरातील एकूण १,७६४ रिक्त जागांसाठी प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यामुळे २२० विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतूच बाहेर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे.
सीईटी सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार १,७६४ रिक्त जागांमध्ये ७८९ एमबीबीएस आणि ९७५ बीडीएस जागांचा समावेश आहे. त्यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १६८ एमबीबीएस आणि ६० बीडीएस जागा रिक्त आहेत, तर खासगी संस्थांमध्ये ६२१ एमबीबीएस आणि ९१५ बीडीएस जागा उपलब्ध आहेत. या १,७६४ जागांसाठी राज्यभरात तिसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तिसऱ्या फेरीत ज्यांना प्रवेश मिळाला आहे, त्यांनी ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान संबंधित महाविद्यालयांमध्ये हजर राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
याच प्रक्रियेदरम्यान सीईटी सेलने २२० विद्यार्थ्यांना प्रवेशातूनच बाद केले आहे. सीईटी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, १७० विद्यार्थ्यांनी चुकीची कागदपत्रे अपलोड केली, तर ५० विद्यार्थ्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत, त्यामुळे त्यांना सध्याच्या तसेच आगामी प्रवेश फेऱ्यांतून बंदी घालण्यात आली आहे. १७१ विद्यार्थ्यांनी चुकीची कागदपत्रे सादर केली होती, त्यापैकी केवळ एका विद्यार्थ्याने मूळ व खरी कागदपत्रे पुन्हा सादर करून त्रुटी दुरुस्त केली. उर्वरित १७० विद्यार्थ्यांनी नोटीस मिळाल्यानंतरही प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे त्यांना वगळण्यात आले.
त्याचप्रमाणे, १०८ विद्यार्थ्यांनी सुरुवातीला कोणतीही कागदपत्रे सादर केली नव्हती, त्यापैकी ५८ विद्यार्थ्यांनी सूचनानंतर प्रतिसाद दिला, मात्र ५० विद्यार्थ्यांनी कागदपत्रे न सादर केल्याने त्यांनाही वगळण्यात आले. या दोन्ही गटांतील एकूण २२० विद्यार्थी सध्याच्या तसेच पुढील प्रवेश फेऱ्यांमधून वंचित राहणार असल्याची माहिती आहे.