जो परका तो पक्षांना प्यारा ! कोणी पक्ष बदलले, कोणी नातेसंबंध वापरले, बंडखोरांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:42 IST2025-11-18T13:37:22+5:302025-11-18T13:42:03+5:30

विदर्भातील चित्र : कोणी पक्ष बदलले, कोणी नातेसंबंध वापरले, बंडखोरांची गर्दी, आयरामांचे स्वागत, घराणेशाहीचे राज्य !

Other people are dear to the parties! Some changed parties, some used their connections, a crowd of rebels | जो परका तो पक्षांना प्यारा ! कोणी पक्ष बदलले, कोणी नातेसंबंध वापरले, बंडखोरांची गर्दी

Other people are dear to the parties! Some changed parties, some used their connections, a crowd of rebels

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूरः
विदर्भातील ११ जिल्ह्यांत नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक अर्ज भरण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस जिल्ह्यातील अनेक राजकीय घडामोडींनी गाजला. उमेदवारीसाठी पक्षात आलेल्या नेत्यांसाठी पायघड्या टाकून उमेदवारी बहाल करण्यात आली तर काही ठिकाणी माजी आमदार, त्यांचे नातेवाईक, राजकीय वारसा असलेल्या घराण्यांमध्ये उमेदवारी दिल्याचे चित्र दिसले.

भंडाऱ्यातील पवनी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) दहा दिवसांपूर्वी भाजपमधून आलेल्या डॉ. विजया नंदूरकर यांच्यावर विश्वास ठेवला. तर माधुरी तलमले या शिंदेसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये दाखल होताच त्यांनाही नगराध्यक्षपदाचे तिकीट मिळाले.

गोंदिया नगरपरिषदेत भाजपचे डॉ. प्रशांत कटरे शिंदेसेनेत प्रवेश करून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले. गडचिरोलीत काँग्रेसने सर्वप्रथू सुरेश पोरेड्डीवार यांना राष्ट्रवादीतून (शरद पवार गट) आपल्या गोटात आणले आणि त्यांच्या पत्नी कविता सुरेश पोरेड्डीवार यांना उमेदवारी दिली. भाजपने गडचिरोलीत माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्या जागी प्रणोती सागर निंबोरकर या नव्या चेहऱ्याला संधी दिली. देसाईगंजमध्येही माजी नगराध्यक्षा शालू दंडवते यांचे तिकीट कापून लता सुंदरकर यांना उमेदवारी देण्यात आली. 

बल्लारपुरात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम मुलचंदाणी यांच्या स्नुषा चैताली दीपक मुलचंदाणी यांनी शिवसेना (उबाठा) च्या तिकिटावर उमेदवारी दाखल केली. वरोऱ्यात भाजपने विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर यांच्या पत्नी माया राजुरकर यांची निवड केली. शिवसेना (शिंदे गट) ने जिल्हाप्रमुख प्रवीण मत्ते यांच्या पत्नी ज्योती मत्ते यांना उमेदवारी दिली. नागभीडमध्ये काँग्रेसने प्रफुल्ल खापर्डे यांच्या पत्नी स्मिता खापर्डे यांना तिकीट जाहीर केले.

माजी आमदारांसह नातेवाइकांना संधी

भंडारा नगर पालिकेत शिंदेसेनेने आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी डॉ. अश्विनी भोंडेकर यांना उमेदवारी दिली. तुमसरमध्ये काँग्रेसने माजी आमदार अनिल बावनकर यांना नगराध्यक्षपदा-साठी तिकीट जाहीर केले. शिंदेसेनेने भाजपमधून आलेल्या कल्याणी भुरे यांना संधी दिली. त्या माजी आमदार यू. व्ही. डायगव्हाणे यांच्या कन्या आहेत. साकोलीमध्ये भाजपने माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या स्नुषा देवश्री मनीष कापगते यांची निवड केली. त्यांचे पती मनीष कापगते माजी नगरसेवक आहेत. चंद्रपुरातील राजुरा येथे काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांचे धाकटे बंधू, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले आहेत.

आ. भारसाकळे, लवटे, अडसड यांच्या आप्तस्वकीयांसह मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ रिंगणात

अमरावती : जिल्ह्यातील १० नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींत निवडणूक तापणार आहे. यंदा आमदारद्वयांनी आप्तस्वकीयांना उमेदवारी मिळवून देण्यात धन्यता मानली असून दर्यापूर नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी भाजपने नलिनी भारसाकळे यांना उमेदवारी दिली आहे. नलिनी या अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी आहेत. तर दर्यापूर मतदारसंघाचे शिवसेना उबाठाचे आमदार गजानन लवटे यांनी पुत्र यश लवटे यांना अंजनगाव सुर्जी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी खेचून आणली आहे. तसेच धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांच्या बहीण अर्चना रोठे-अडसड यांना धामणगाव नगर परिषद नगराध्यपदासाठी भाजपने उमेदवारी दिली आहे. आमदारद्वयांनी नातलगानाच उमेदवारी दिल्याने निष्ठावंतामध्ये खदखद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांनी चिखलदरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपातून नामांकन दाखल केल्याने राजकीयदृष्ट्या ही निवडणूक रंगणार आहे. आल्हाद कलोती यांना उपनगराध्यक्षपद दिले जाईल, अशी भाजप सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

Web Title : विदर्भ नगरपालिका चुनावों में दल-बदलुओं, रिश्तेदारों का दबदबा।

Web Summary : विदर्भ नगरपालिका चुनावों में पार्टी बदलने और पारिवारिक संबंधों को प्राथमिकता दी गई। पूर्व विधायकों के रिश्तेदारों और नए लोगों को टिकट मिले, जिससे निष्ठावानों में असंतोष है। प्रमुख उम्मीदवारों में प्रमुख राजनेताओं के रिश्तेदार शामिल हैं।

Web Title : Party hoppers, relatives dominate Vidarbha's municipal election nominations.

Web Summary : Vidarbha municipal elections see party switching, family ties prioritized for nominations. Former MLAs' relatives and newcomers get tickets, causing discontent among loyalists. Key candidates include relatives of prominent politicians.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.