नागपुरात ७० कोटी रूपये खर्चून स्थापन होणार संत्र्याचे क्लीन प्लांट सेंटर
By आनंद डेकाटे | Updated: November 21, 2025 18:17 IST2025-11-21T18:15:40+5:302025-11-21T18:17:47+5:30
केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान : ॲग्रो व्हीजन कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

Orange Clean Plant Center to be set up in Nagpur at a cost of Rs 70 crore
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात ७० कोटी रूपये खर्चून संत्र्याचे ‘क्लीन प्लांट सेंटर स्थापन होणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शुक्रवारी येथे केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित ॲग्रोव्हीजन २०२५ या भव्य कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. ॲग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. राजकुमार बडोले, आ. चरणसिंग ठाकूर, एनडीडीबीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिनेश शाह, एसएमएलच्या कोमल शहा प्रमुख अतिथी होते. तर नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. माधवी खोडे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख, माफसुचे कुलगुरू डाॅ. नितीन पाटील, ग्लोबल कॉर्पोरेट अँड इंडस्ट्री सागर कौशिक, महिंद्राचे अध्यक्ष विजय राम नाकरा, ॲग्रोव्हीजन आयोजन समितीचे सल्लागार डॉ. सीडी माई, डॉ. गिरीश गांधी प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री चौहान म्हणाले, शेतकऱ्यांना चांगले रोप मिळाले तरच ते चांगले उत्पादन घेऊ शकतील. त्यामुळे चांगल्या नर्सरी निश्चित करून त्यांना अर्थसहाय्य केले जाईल. मोठ्या नर्सरीला ४ कोटी रूपययापर्यंततर लहान नर्सरीला दोन कोटी रूपयापर्यंत अर्थसहाय्य केले जाईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. सध्या लडकी बहीणीचा बोलबाला आहे, परंतु ही लाडकी बहीण लखपती बहीण बनली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दालमिल उभारण्यासाठी २५ लाख रूपयापर्यंत सबसिडी दिली जात असून पंतप्रधान पीक विमा योजनेत आता शेतात पणी साचल्याने व न्य प्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानीचाही समावेश करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी बुटीबोरी मध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. आयोजन सचिव रवी बोरटकर यांनी स्वागतपर भाषण केले.
ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर शेतकऱ्यांचे आर्थिक विकास केंद्र बनणार : नितीन गडकरी
स्पेन मध्ये ज्याप्रकारे फार्मर बिजनेस स्कूल आहे, त्याच धर्तीवर अमरावती रोडवरील कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ॲग्रो कन्वेंशन सेंटर स्थापन होत आहे. यामध्ये जागतिक दर्जाचे फार्मर बिजनेस स्कूल तयार होणार त्याचा लाभ विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना होईल आणि त्यांचा आर्थिक विकास झपाट्याने होऊ शकेल असा आशावाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारचे पूर्ण सहकार्य : दत्तात्रय भरणे
शेतीत चांगले प्रयोग करावेत, चांगले वाण वापरावे, शेतीपूरक व्यवसाय करावेत आणि बदल करावा असा सल्ला राज्याचे कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला. पेरणी ते कापणी पर्यंत राज्य सरकारचा शेती विभाग शेतकऱ्यांना सहकार्य करण्यास तत्पर आहे. कृषी संजीवनी सारख्या योजना राज्य राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. ॲग्रो व्हिजन मधून मिळालेल्या सूचना आणि मार्गदर्शन यावर राज्य सरकार साकारात्मक विचार करेल असे आश्वासन त्यांनी दिले.