onion rates reduced | कांदा थोडा घसरला; किरकोळमध्ये ६० रुपये किलो
कांदा थोडा घसरला; किरकोळमध्ये ६० रुपये किलो

ठळक मुद्देमध्यम व हलक्या दर्जाची जास्त आवकआणखी भाव कमी होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आठवड्यापासून कांदे शेतातून मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्यात येत असून राज्यातील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी जात आहेत. पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, धुळे, औरंगाबाद येथे कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे घाऊक बाजारात कांद्याचे भाव २० ते ३० रुपये किलो कमी झाले आहेत. याशिवाय कळमना आलू-कांदे बाजारात पूर्वीपेक्षा आवक वाढल्याने भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात हलक्या व मध्यम दर्जाच्या कांद्याचे भाव ४० ते ५५ रुपयादरम्यान आहेत.

उत्तम प्रतीचे १० टक्के तर मध्यम व हलक्या दर्जाची ९० टक्के आवक
कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी सांगितले की, कळमन्यात सर्वोत्तम दर्जाच्या कांद्याचे भाव ६० ते ६५ रुपये, मध्यम ५० ते ५५ आणि हलक्या दर्जाच्या कांद्याचे भाव ४० ते ४५ रुपये किलो आहेत. आठवड्यापासून आवक वाढल्यामुळे भाव प्रति किलो २० ते ३० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. किरकोळ बाजारात ग्राहकांनी खरेदी कमी केल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून कांद्याची उचल कमी आहे. त्याचाही परिणाम भावाच्या घसरणीवर झाला आहे. कळमन्यात दररोज २० ते २२ ट्रकची आवक आहे. त्यात उत्तम प्रतीचा कांदा केवळ १० टक्के येत आहे. उर्वरित कांद्याचा दर्जा निकृष्ट आहे. भाव जास्त मिळत असल्यामुळे शेतकरी रात्री कांदा शेतातून काढून थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. चार दिवसांपासून सोलापूर बाजारात एकाच दिवशी ४०० ट्रक आले होते.
एवढेच नव्हे तर देशाच्या सर्वच भागात कांद्याची आवक वाढली आहे. त्यातील बहुतांश कांदे खराब झाले. पुढे आवक वाढून भाव कमी होण्याची शक्यता आहे.

कळमन्यात दररोज २० ट्रकची आवक
वसानी म्हणाले, आवक वाढली, पण लोकांची खरेदीची क्षमता कमी झाली आहे. त्याचा परिणाम विक्रीवर झाला आहे. पूर्वी लागवड केलेले कांदे पावसाने खराब झाले. नंतरच्या लागवडीचे कांदे काही दिवसात बाजारात येणार आहे. त्याचा दर्जा चांगला राहील. शिवाय भावही कमी राहण्याची शक्यता आहे. इराण, इजिप्त आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या कांद्यामुळे भाववाढीवर नियंत्रण आले आहे. मुंबई बंदरात आवक वाढली आहे. सध्या औरंगाबाद, धुळे, जळगाव आणि अहमदनगर येथून कांद्याची आवक आहे. भाव कमी झाल्यामुळे आंध्रप्रदेश आणि कर्नाटक येथून आवक बंद झाली आहे.
नंदनवन आठवडी बाजारातील कांदे विक्रेते दिलीप लिल्हारे म्हणाले, गेल्या आठवड्यात जास्त भावामुळे ग्राहकांनी कांदे खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे १५०० रुपयांचा तोटा सहन करावा लागला. कळमन्यातून खरेदी केलेल्या कांद्याला ग्राहक न मिळाल्यामुळे कांदे खराब झाले. अखेर फेकावे लागले. भाव स्थिर होईपर्यंत कांद्याऐवजी अन्य भाज्यांची विक्री सुरू केली आहे.

बटाटे महाग
पावसाचा फटका बटाटे पिकाला फटका बसल्यामुळे आवक कमी झाली. परिणाम भाव वाढले आहेत. कळमन्यात १८ ते २० रुपये भाव आहे. किरकोळमध्ये ३० रुपये भावाने विक्री होत आहे. छिंदवाडा येथून नवीन मालाची आवक आहे, शिवाय जुन्या बटाट्याची विक्री सुरू आहे. अलाहाबाद, कानपूर आणि उत्तर प्रदेशातील काही भागातून बटाट्यांची आवक जानेवारीच्या अखेरीस सुरू होणार आहे. तोपर्यंत भाव कमी होणार नाहीत, असे वसानी यांनी स्पष्ट केले.

Web Title: onion rates reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.