'टीनएज'मधील एकतर्फी प्रेम की धोकादायक वेड?
By योगेश पांडे | Updated: September 1, 2025 13:28 IST2025-09-01T13:27:33+5:302025-09-01T13:28:06+5:30
Nagpur : अल्पवयीन मुलांचे बिघडलेले वर्तन अन् पालकांचे दुर्लक्ष आपण आपल्या मुलांना वेळ, समज आणि आधार देत आहोत का?

One-sided love or dangerous obsession in 'Teenage'?
Nagpur Crime Story : अकराव्या-बाराव्या वर्षाच्या वयापासूनच विद्यार्थिनी दोन वर्ष मोठ्चा असलेल्या मुलांसोबत मॉलमध्ये फिरायला जातात, एकट्या चित्रपट पाहायला जातात. कधी लॉग ड्राइव्ह तर कधी हॉटेलिंग करणे, याची घरच्यांना कुठलीही कल्पना नसते. रील्स आणि ओटीटीमधून मिळणारे नको ते 'संस्कार' या वयोगटातील मुलामुलींना वाकडा विचार करायला भाग पाडतात. त्यातून मग एका 'वेडा'ची कहाणी सुरू होते. स्वैर आचरणाला कधी ते प्रेम समजतात आणि एकतर्फी प्रेमातून ते धोकादायक व रक्तरंजीत कहाणीत कधी बदलते हे कळतदेखील नाही.
नागपूरच्या अजनी रेल्वे कॉलनी परिसरात एंजेल या दहावीतील विद्यार्थिनीची अल्पवयीन मुलानेच केलेली निघृण हत्या केवळ एक गुन्हा नसून समाजासाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे. १७ वर्षांच्या मुलाशी मैत्री, त्यातून निर्माण झालेले आकर्षण, 'तू मेरी नही तो और किसी की नहीं' हा बॉलिवूडने अनेक वर्षांअगोदर दिलेला 'विचार', मुलींना हक्काची वस्तू समजण्याची मानसिकता अन् बरे वाईट यांची समज हरवून घेतलेला जीव. झालेला हा प्रकार अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करणारा आहे. टीनएज वयातील एकतर्फी प्रेम, सोशल मीडियावरील आभासी नाती, पालकांचे होणारे दुर्लक्ष आणि मुलांच्या मनातील अस्वस्थता आणि दिशाहीन विचार या अनेक समस्या यातून प्रकर्षाने समोर आल्या आहेत.
'टीनएज'चे वय आणि नात्यांची गुंतागुंत
१२ ते १७ वर्षे हा काळ मुलांच्या व्यक्तिमत्त्व घडणीचा सर्वांत नाजूक टप्पा असतो. या वयात त्यांना स्वातंत्र्याची ओढ असते, पण निर्णयक्षमतेची परिपक्वता नसते. शाळेतील मैत्री, एकतर्फी आकर्षण आणि 'माझ्या मनासारखंच व्हावं' हा हट्ट, यामुळे वाद आणि हिंसक प्रतिक्रिया दिसून येतात. एंजेलच्या प्रकरणात मुलाने "मैत्री टिकवली नाही तर जीव घेईन" अशी धमकी दिली होती. हे अत्यंत धोकादायक मानसिक असंतुलनाचे लक्षण होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
पालकांचे दुर्लक्ष - मुलांचे एकटेपण
आज अनेक पालक नोकरी, व्यवसाय किंवा इतर जबाबदाऱ्यांमध्ये इतके गुंततात की मुलांच्या भावनिक आयुष्याकडे लक्ष देत नाहीत. मोबाइल, इंटरनेट आणि सोशल मीडिया यामुळे मुलांच्या वागण्यातले बदल सहज लक्षात येत नाहीत. एंजेलने आईला थमकीबाबत सांगितले होते, मात्र त्यापुढील टप्प्यावर योग्य समुपदेशन आणि कडक पावले उचलली गेली नाहीत. प्रशासनानेदेखील तक्रार नसल्याने कारवाई केली नाही. प्रशासन आणि मानसिकता यांच्यातील ही पोकळीच अल्पवयीन आरोपीसाठी संधी ठरली.
सोशल मीडिया - नकली नाती आणि खरी संकटे -
मित्रत्वाच्या नावाखाली ऑनलाइन चॅटिंग, फोटो शेअर करणे, आभासी जवळीक- हे आज शालेय वयातील मुलांचे रोजचे आयुष्य झाले आहे. यातून एक 'खोटा जवळीकपणा' निर्माण होतो. फोटो व्हायरल करण्याची धमकी, ब्लॅकमेलिंग किंवा मानसिक दबाव आणणे हे गुन्हे आता सर्रास होत आहेत. या वयातील मुले 'प्रायव्हसी'चा अर्थ न समजता सर्व काही मोबाइलमध्ये कैद करतात. त्याचा गैरफायदा इतरांकडून घेतला जातो.
मानसिक अस्वस्थता आणि आक्रमकता
टीनएज वयात मुलांना भावनांवर नियंत्रण ठेवणे अवघड जाते. प्रेमभंग, नकार किंवा टीका- हे सहन करण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. लहान वयापासूनच पालक मुला-मुलींचे नको तितके लाड करतात. क्षमता नसतानादेखील त्यांचे महागडे हट्ट पूर्ण करतात. शिक्षकदेखील कशाला हवी ब्याद म्हणून मुलांना शिस्त लावण्यासाठी मनापासून फारसे प्रयत्न करत नाहीत. एकूणच पालक, शिक्षक आणि समाज या वयात योग्य मार्गदर्शन करण्यात कमी पडत आहेत. त्यातूनच या वयोगटातील मुलामुलींमध्ये मानसिक अस्थिरता दिसून येते. एंजेलच्या हत्येसारखी घटना ही याच मानसिक अस्थिरतेचे द्योतक आहे.
उपाय काय?
- पालकांची भूमिका : मुलांच्या मोबाइल वापरावर लक्ष ठेवणे, त्यांच्यासोबत संवाद वाढवणे आणि त्यांचे भावनिक प्रश्न ऐकून घेणे.
- शाळेची जबाबदारी: समुपदेशन कक्ष, मानसिक आरोग्यविषयक कार्यशाळा, आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींना 'एकतर्फी प्रेम' व 'ऑनलाइन धोके' याबाबत माहिती देणे.
- समाजाची संवेदनशीलता: किशोरवयीन गुन्ह्यांना केवळ कायदेशीर दृष्टिकोनातून न पाहता, त्यांच्या मानसिक उपचार आणि पुनर्वसनाची आवश्यकता ओळखणे.
- सोशल मीडिया नियंत्रण : मुलांना सुरक्षित इंटरनेट वापराबाबत शिक्षण देणे आणि पालकांनी योग्य नियंत्रण ठेवणे
हा समाजासाठीच सवाल
एंजेलची हत्या ही एका अल्पवयीन मुलाच्या चुकीच्या विचारसरणीचा परिणाम असली, तरी त्यामागे समाजातील अनेक त्रुटी दडलेल्या आहेत. मुलांना योग्य वेळ न देणारे पालक, मोबाइल आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेली पिढी, आणि भावनिक दुर्लक्ष हे सर्व मिळून अशा भीषण घटनांना कारणीभूत ठरत आहे. आजचा सवाल फक्त एवढाच आपण आपल्या मुलांना वेळ, समज आणि आधार देत आहोत का?