दर दीड दिवसाला नागपूर शहरात एक बेवारस मृत्यू; २० टक्के मृत्यू अनैसर्गिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 08:00 AM2022-07-20T08:00:00+5:302022-07-20T08:00:07+5:30

Nagpur News मागील काही काळापासून बेवारस मृतांचे प्रमाण वाढले असून, या वर्षी सहा महिन्यांतच सव्वाशेहून अधिक बेवारस मृत्यूंची नोंद झाली आहे. जर आकड्यांची गोळाबेरीज केली, तर नागपुरात दर दीड दिवसाला एक बेवारस मृत्यू झाला आहे.

One bereaved death in Nagpur city every day and a half; 20 percent of deaths are unnatural | दर दीड दिवसाला नागपूर शहरात एक बेवारस मृत्यू; २० टक्के मृत्यू अनैसर्गिक

दर दीड दिवसाला नागपूर शहरात एक बेवारस मृत्यू; २० टक्के मृत्यू अनैसर्गिक

googlenewsNext
ठळक मुद्दे शासकीय रुग्णालयांपाठोपाठ बाजारपेठांत सर्वाधिक मृत्यू

योगेश पांडे

नागपूर : उन्हाळ्यात शहरातील तापमान उच्चांकावर पोहोचले असताना शहरात बऱ्याच जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. यात बेवारस मृतांचे प्रमाण अधिक होते. मागील काही काळापासून बेवारस मृतांचे प्रमाण वाढले असून, या वर्षी सहा महिन्यांतच सव्वाशेहून अधिक बेवारस मृत्यूंची नोंद झाली आहे. जर आकड्यांची गोळाबेरीज केली, तर नागपुरात दर दीड दिवसाला एक बेवारस मृत्यू झाला आहे.

‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत नागपूर शहरात १३३ बेवारस मृतदेह आढळले. यांतील बहुतांश मृत्यू हे नैसर्गिक होते. मात्र २८ मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाल्याची बाब शवविच्छेदनातून समोर आली होती. मृतांमध्ये महिलांचे प्रमाण हे अत्यल्प होते व ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाणच अधिक होते. या बेवारस मृतदेहांचा अंत्यविधी करण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागते. नियमानुसार एखाद्या बेवारस व्यक्तीचा मृतदेह आढळल्यास पोलीस त्याची नोंद करतात.

२८ टक्के मृत्यू बाजारपेठांच्या परिसरात

नागपूर पोलिसांच्या आकडेवारीनुसार ३८.३४ टक्के मृत्यू मेयो, मेडिकल यांच्यासह इतर शासकीय रुग्णालयांमध्ये झाले; तर २८ टक्के मृत्यू हे शहरातील बाजारपेठांच्या परिसरात झाले. यात प्रामुख्याने सीताबर्डी, लकडगंज, सेंट्रल एव्हेन्यू, सक्करदरा या बाजारपेठांचा समावेश आहे. प्रामुख्याने या बाजारपेठांच्या परिसरात अनेक भटके लोक राहतात. तेथे अन्नपाणी सहजपणे मिळते व त्यामुळेच या ठिकाणी अशा लोकांचा वावर जास्त प्रमाणात असतो.

उष्माघाताचा सर्वाधिक फटका

रोजीरोटीच्या शोधात अनेकजण परराज्यांतून येतात; तर काहीजण कौटुंबिक कलहातून, तर काहीजण मानसिक आजारांनी त्रस्त असल्याने घर सोडतात. शहरात आल्यावर हे लोक रेल्वेस्थानके, बसस्थानके, तर कित्येकदा रस्त्यावरच राहतात. त्यांना दोनवेळचे जेवण मिळणे शक्य नसते. रस्त्यावर राहिल्याने साथीच्या आजाराने अनेकांचा त्यात मृत्यू होतो. उन्हाळ्याच्या काळात गरमीमुळे अनेकांना उष्माघात होतो व त्यातच रस्त्यावर जीव जातो.

नातेवाइकांचा शोध घेणे कठीण

बेवारस मृतांच्या नातेवाइकांचा शोध घेण्याचे काम पोलीस करतात. मात्र सतत बंदोबस्त आणि अन्य कारणांमुळे पोलिसांनाही त्या नातेवाइकांचा शोध घेणे कठीण होऊन बसते.

 

Web Title: One bereaved death in Nagpur city every day and a half; 20 percent of deaths are unnatural

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू