केरळ एक्सप्रेसच्या धडकेत दीड वर्षांच्या वाघाचा जागीच मृत्यू ! नागपूरजवळ रेल्वेची धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 19:12 IST2026-02-18T19:09:30+5:302026-02-18T19:12:34+5:30
Nagpur : मंगळवारी रात्री नागपूर जवळील बुट्टीबोरी परिसरात रेल्वेच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रेनच्या लोको पायलटने याची माहिती स्टेशन मास्टरांना दिली.

One and a half year old tiger dies on the spot after being hit by Kerala Express! Train collision near Nagpur
नागपूर : मंगळवारी रात्री नागपूर जवळील बुट्टीबोरी परिसरात रेल्वेच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रेनच्या लोको पायलटने याची माहिती स्टेशन मास्टरांना दिली. स्टेशन मास्टरांनी वन विभागाला घटनेची कल्पना दिली. त्यानंतर नागपूर टीटीसीमधून एक पथक घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून वाघाचा मृतदेह नागपूर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे नेण्यात आला. येथे शवविच्छेदन केल्यानंतर नियमानुसार वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नागपुरात रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची ही कदाचित पहिलीच घटना असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत वाघ अंदाजे दीड वर्षांचा होता. काही दिवसांपूर्वी पोही गाव येथील पांधन रोड परिसरात हा वाघ दिसला होता. तेथून जाणाऱ्या नागरिकांनी त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार रात्री ९.१४ वाजता केरळ एक्सप्रेस 12625 नागपूरकडे येत होती. जामठा स्टेडियम जवळ अचानक एक वाघ रेल्वे रुळांवर आला. त्यानंतर ट्रेनची जोरदार धडक बसल्याने वाघ रुळांच्या बाजूला फेकला गेला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. धडक अतिशय तीव्र होती.
यानंतर लोको पायलटने स्टेशन मास्टरांना माहिती दिली. रेल्वे प्रशासनाने तात्काळ वन विभागाला घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात आली.