नागपुरातील नेताजी फूल मार्केटमध्ये ‘ऑन ड्युटी’ पोलीस हवालदाराला मारहाण
By योगेश पांडे | Updated: March 6, 2023 21:16 IST2023-03-06T21:11:56+5:302023-03-06T21:16:14+5:30
Nagpur News नेताजी फूल मार्केटमध्ये एका पोलीस हवालदारालाच बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

नागपुरातील नेताजी फूल मार्केटमध्ये ‘ऑन ड्युटी’ पोलीस हवालदाराला मारहाण
नागपूर : नेताजी फूल मार्केटमध्ये एका पोलीस हवालदारालाच बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित हवालदार कर्तव्यावर असताना हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणात सहाहून अधिक आरोपींना अटक केली आहे.
सुनिल शिंदे असे संबंधित हवालदाराचे नाव आहे. शिंदे हे तीन मार्च रोजी भिडे गर्ल्स स्कूल येथील दहावी-बारावीच्या पेपर ठेवल्या जाणाऱ्या स्ट्रॉंग रुममध्ये कर्तव्यावर होते. बाजाराचा दिवस असल्याने एका विक्रेत्याने शाळेच्या प्रवेशद्वारावरच भाजीचे क्रेट्स ठेवले होते. ते हटविण्याची सूचना शिंदे यांनी केली असता एका व्यक्तीने त्यांच्याशी बाचाबाची केली व अंगावर आला. शिंदे यांनी त्याला पकडून ठेवले असता सहा ते सात साथीदार तेथे आले व त्यांनी शिंदे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी अक्षरश: लाथाबुक्क्यांनी तसेच काडीने मारहाण केली व त्यात शिंदे जखमी झाले. घटनास्थळाजवळील एका व्यक्तीने पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांचे पथक लगेच तेथे आले व त्यांनी शिंदे यांची सुटका करत त्यांना इस्पितळात नेले. तर आरोपी प्रदीप शाहू (हुडकेश्वर), ऋतिकेश महेश गौर (गणेशपेठ), आनंद शिवलाल गौर (बजेरिया), नियाज बिलाल पठान (आदर्शनगर), राहुल गौर (गणेशपेठ), अजय गौर (तहसील) यांना अटक केली. शिंदे यांच्या तक्रारीनंतर संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे खळबळ माजली आहे.