Driving License Test: ड्रायव्हिंग लायसन्ससाठी होणार ऑन-कॅमेरा टेस्ट ; अपात्र चालकांना बसेल आळा !
By सुमेध वाघमार | Updated: December 4, 2025 17:12 IST2025-12-04T17:11:27+5:302025-12-04T17:12:20+5:30
Nagpur : ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे आता खऱ्या अर्थाने ‘कठोर परीक्षेची’ कसोटी ठरणार आहे. परिवहन आयुक्तांच्या नव्या निदेर्शांनुसार आरटीओमध्ये घेतली जाणारी ड्रायव्हिंग टेस्ट आता ठराविक वेळेत, कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आणि अधिक पारदर्शक पद्धतीने होणार आहे.

On-camera test to be conducted for driving license; Unqualified drivers will be curbed!
नागपूर :ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे आता खऱ्या अर्थाने ‘कठोर परीक्षेची’ कसोटी ठरणार आहे. परिवहन आयुक्तांच्या नव्या निदेर्शांनुसार आरटीओमध्ये घेतली जाणारी ड्रायव्हिंग टेस्ट आता ठराविक वेळेत, कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आणि अधिक पारदर्शक पद्धतीने होणार आहे. कठोर वेळापत्रक, ऑन-कॅमेरा टेस्ट आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून पास झालेल्यांची पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे. या सर्वामुळे अपात्र चालकांना आळा बसेल, तर रस्त्यांवर अधिक सक्षम व जबाबदार वाहनचालक उतरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रस्त्यावर होणाऱ्या अपघातांपैकी सुमारे ८० टक्के पेक्षा अधिक अपघात हे वाहन चालकाच्या बेफिकीर वृत्ती व निष्काळजीपणामुळे होतात. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी योग्य चालकांनाच वाहन परवाना मिळावा (ड्रायव्हिंग लायसन्स) या हेतुने परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी आरटीओतील गुणवत्तापूर्ण ‘ड्रायव्हिंग टेस्ट’बाबतचे निकष तयार केले आहेत. त्या संदर्भाचे पत्र ३ डिसेंबर रोजी सर्व आरटीओला देण्यात आले आहे. यात दुचाकीसाठी ५ मिनीट, कारसाठी ७ मिनीट तर अवजड वाहनांसाठी १० मिनीटांचा कालावधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही टेस्ट ‘ऑन-कॅमेरा’ होणार आहे. एवढेच नाही तर ड्रायव्हिंग टेस्टमध्ये १० टक्केच उमेदवार नापास झाल्यास प्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पास झालेल्या उमेदवाराची स्वत:हून टेस्ट घेण्याचा सूचनाही दिल्या आहेत. नियमांचा भंग करणाऱ्या अधिकाऱ्यांविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयास प्रस्ताव सादर करण्याचेही पत्रात निर्देश दिले आहेत.
ही आहे नियमावली
- प्रत्येक ड्रायव्हिंग टेस्ट कॅमेऱ्याच्या निगराणीत घ्यावी.
- टेस्टच्या आदल्यादिवशी ड्रायव्हिंग टेस्ट देणाऱ्या उमेदवारांची प्रिंट काढून कोणता निरीक्षक किती ड्रायव्हिंग टेस्ट घेणार याची यादी तयार करून ती दुसऱ्या दिवशी दर्शनी ठिकाणी लावावी.
- ड्रायव्हिंग स्कुलमार्फत येणाऱ्या उमेदवाराची चाचणी संबंधित ड्रायव्हिंग स्कुलच्या वाहनावर घ्यावी. चाचणीपूर्वी वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी करावी
- ड्रायव्हिंग टेस्टनंतर निरीक्षकांनी अंतिम मान्यतेचे काम विहित कालावधीत संगणकावर करावे.
- ड्रायव्हिंग टेस्ट परिसरात ३० दिवसांच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे.
वेळेचं बंधन
दुचाकी आणि तीन चाकी वाहने: ५ मिनिटे ड्रायव्हिंग टेस्ट
कार आणि मध्यम चारचाकी वाहने: ७ मिनिटे ड्रायव्हिंग टेस्ट
अवजड वाहने: १० मिनिटे ड्रायव्हिंग टेस्ट