न.प. मुख्याधिकारी पदाचा पदभार कोणी स्वीकारेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST2021-02-13T04:09:13+5:302021-02-13T04:09:13+5:30
सौरभ ढोरे काटोल : प्रशासनाच्या वतीने सोपविण्यात आलेली जबाबदारी नेटाने पार पाडण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असते. मात्र काटोल न.प.चा मुख्याधिकारी ...

न.प. मुख्याधिकारी पदाचा पदभार कोणी स्वीकारेना!
सौरभ ढोरे
काटोल : प्रशासनाच्या वतीने सोपविण्यात आलेली जबाबदारी नेटाने पार पाडण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असते. मात्र काटोल न.प.चा मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापासून जिल्ह्यातील अधिकाऱ्याकडून नन्नाचा पाढा वाचला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मानत नसतील तर त्यांना कुणाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे, असा सवाल काटोल शहरात सध्या विचारला जात आहे.
अवैध गुंठेवारी प्रकरणानंतर काटोल न.प.चा कारभार चव्हाट्यावर आला. गेल्या आठवड्यात येथील नगररचना विभागातील दोन अधिकारी लाच घेताना पकडल्या गेले. त्यामुळे काटोल न.प. प्रशासनाची विस्कटलेली घडी दुरुस्त करणे गरजेचे आहे. काटोल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक गराटे यांची २१ जानेवारी बदली झाली. त्यानंतर २२ जानेवारीला काटोल पालिकेचा अतिरिक्त पदभार नरखेडच्या मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांच्याकडे सोपविण्यात आला. यातच पालिकेच्या नगर रचना विभागातील दोन अधिकाऱ्यांना ८ फेब्रुवारी रोजी १.२५ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. या घटनेच्या दोन दिवसांनी मुख्याधिकारी मानकर यांनी अतिरिक्त पदभारातून मुक्त करण्याचा विनंती अर्ज जिल्हाधिऱ्यांकडे सादर केला. ११ फेब्रुवारीला त्यांची विनंती मान्य करण्यात आली. त्यानंतर पालिकेचा अतिरिक्त पदभार स्वीकारण्याचे आदेश काटोलचे तहसीलदार अजय चरडे यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले. परंतु चरडे यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नाही. काटोल तालुक्याची व्याप्ती आणि सध्याचे कामाचे स्वरूप लक्षात घेता चरडे यांनी न.प.चा पदभार स्वीकारला नसल्याचे समजते.
-
काटोल न.प.च्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार काढण्याबाबत विनंती अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे केला होता. तो मान्य झाल्याने ११ फेब्रुवारीला माझ्याकडे अतिरिक्त पदभार काढण्यात आलेला आहे.
- प्रवीण मानकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, नरखेड.
--
काटोल तहसील कार्यालयाचा कारभार मोठा आहे. तालुक्याची व्याप्ती अधिक आहे. त्यामुळे दोन्ही पदावर न्याय देणे शक्य होणार नाही. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती अर्ज सादर केला आहे.
- अजय चरडे, तहसीलदार, काटोल.