Now direct contact with the victims through ‘IVR system’ | आता ‘आयव्हीआर प्रणाली’द्वारे बाधितांशी थेट संपर्क

आता ‘आयव्हीआर प्रणाली’द्वारे बाधितांशी थेट संपर्क

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवले जात आहे. अशा रुग्णांच्या प्रकृतीची वेळेवर विचारपूस व्हावी, त्यांना त्रास असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला मिळावा. यासाठी मनपा ‘इंटरेक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स’ (आय.व्ही.आर.) प्रणाली वापरणार आहे. याव्दारे आता विलगीकरणातील बाधितांशी थेट संपर्क साधला जाईल.
यासंदर्भात मनपाने ‘स्टेप वन’ कंपनीसोबत केलेल्या करारानुसार शहरातील कोरोना रुग्णांना आयव्हीआर पध्दतीच्या माध्यमाने दूरध्वनीवरुन संपर्क करण्यात येईल. शहरात दररोज ५०० च्या वर कोरोना रुग्ण आढळत आहेत. या सर्वांशी व्यक्तिगतरित्या दूरध्वनीव्दारे संपर्क करणे अवघड आहे. यावर उपाय म्हणून आयव्हीआर माध्यमातून संपर्क केला जाईल. फोन आल्यानंतर रुग्णाला फोनवर सांगण्यात येणारे नंबर दाबून आपल्या प्रकृतीची माहिती द्यावी लागेल. प्रकृती खालावलेली आढळल्यास त्या रुग्णाचा मोबाईल क्रमांक तज्ज्ञ डॉक्टरांना दिला जाईल. डॉक्टर त्यांना संपर्क करुन आवश्यक सल्ला देतील.
यासंबंधी आयुक्त राधाकृष्णन बी. आणि स्टेप वन कंपनी यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या कंपनीच्या माध्यमातून देशात अनेक शहरांमध्ये कोविड रुग्णांशी संपर्क साधण्यात यश आले आहे.
या सेवेचा गृह विलगीकरण मध्ये राहणाऱ्या कोरोना रुग्णांना फायदा होईल. त्यांची प्रकृती बरी नसल्यास डॉक्टर त्यांना वेळेत उपचार करण्यास मदत करतील, असे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी सांगितले.
लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणामध्ये राहण्यात अनुमती आहे. रुग्णाच्या घरी व्यवस्था नसल्यास मनपाद्वारे कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची नि:शुल्क व्यवस्था करण्यात येते. गृह विलगीकरणातील रुग्णांकरिता ही सिस्टीम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

प्रणालीचे असे आहेत फायदे
विलगीकरणातील रुग्णांशी थेट संपर्क
रुग्ण स्वत:च आपल्या प्रकृतीची काळजी घेऊ शकतील.
प्रकृती बरी नसल्यास तज्ज्ञ डॉक्टर उपचाराला मदत करतील.

Web Title: Now direct contact with the victims through ‘IVR system’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.