कुख्यात गुंडांचा नागपुरातील गणेशपेठ परिसरात पुन्हा हैदोस : प्रचंड दहशत, नागरिक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:08 IST2019-08-05T23:01:13+5:302019-08-05T23:08:39+5:30
कुख्यात गुंड शेख अजहर शेख मजहर याने आपल्या साथीदारांसह रविवारी मध्यरात्रीपासून गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात प्रचंड हैदोस घातला. दुकानदाराच्या गळ्याला घातक शस्त्र लावून त्याच्याकडून रक्कम लुटली. तर, बाजुच्या दुकानाचे शोकेस फोडले. नंतर बियरबारमध्ये तोडफोड करून या भागातील २६ वाहनांचीही तोडफोड केली. अवघ्या तीन आठवड्यात दुस-यांदा अशा प्रकारची घटना घडल्याने गणेशपेठ परिसरात प्रचंड दहशत आणि संताप निर्माण झाला असून, गणेशपेठ पोलिसांच्या निष्क्रीयतेवर नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.

कुख्यात गुंडांचा नागपुरातील गणेशपेठ परिसरात पुन्हा हैदोस : प्रचंड दहशत, नागरिक संतप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुंड शेख अजहर शेख मजहर याने आपल्या साथीदारांसह रविवारी मध्यरात्रीपासून गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात प्रचंड हैदोस घातला. दुकानदाराच्या गळ्याला घातक शस्त्र लावून त्याच्याकडून रक्कम लुटली. तर, बाजुच्या दुकानाचे शोकेस फोडले. नंतर बियरबारमध्ये तोडफोड करून या भागातील २६ वाहनांचीही तोडफोड केली. अवघ्या तीन आठवड्यात दुस-यांदा अशा प्रकारची घटना घडल्याने गणेशपेठ परिसरात प्रचंड दहशत आणि संताप निर्माण झाला असून, गणेशपेठ पोलिसांच्या निष्क्रीयतेवर नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात शेख अजहर, आमिर आणि त्यांचा एक अल्पवयीन साथीदार हातात शस्त्र घेऊन रविवारी रात्री ११ वाजता बजेरिया चौकात पोहचले. त्यांनी चौकात उभ्या असलेल्या दोन कारच्या काचा फोडल्या. तेथून शिवीगाळ करीत ते बाजुला गेले. तेथे आणखी दोन कारच्या कांचा फोडल्यानंतर आरोपी नागोबा मंदीर गल्लीत गेले. तेथे कार आणि ऑटोंची तोडफोड केली. तेथून लोधीपु-यात जाऊन ३ कार तसेच २ मोपेडची तोडफोड केली.
दरम्यान, अनेकांनी पोलिसांना फोन करून ही माहिती दिली. मात्र, लेटलतिफिसाठी ओळखल्या जाणा-या गणेशपेठ पोलिसांकडून याहीवेळी तत्परता दाखवण्यात आली नाही. पोलीस मदतीला धावत नसल्याचे पाहून सुमारे ३०० ते ४०० संतप्त नागरिकांचा जमाव आरोपी शेख अजहरच्या घरावर चालून गेला. मात्र, तो हाती लागला नाही. त्यामुळे हा जमाव गणेशपेठ ठाण्यात पोहचला. जमावाने बेखौप गुंड आणि उदासिन पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून तातडीने आरोपींना पकडण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर पोलिसांनी धावपळ सुरू केली. प्रशांत शाहू यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी अजहर आणि आमिरला अटक केली.
मोठा अनर्थ टळला
नागरिकांमधील रोष लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना आज दुपारी १. ३० वाजता गीतांजली चौकात नेले. येथे पोलीस उपायुक्त राहुल माकणिकर यांनी अजहर आणि आमिरला पायी फिरवत त्यांचा पानउतारा केला. यावेळी त्यांनी गुंडांना घाबरू नका, त्यांच्याबद्दल काही तक्रार असेल तर पोलिसांशी संपर्क करा, असे आवाहन केले. विशेष म्हणजे, नागरिकांच्या मनात आरोपींबद्दल एवढा रोष होता की अनेकांनी आरोपींकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना आमच्या हवाली करा, अशी जोरदार मागणी केली. प्रकरण भलत्याच वळणावर जाऊ शकते, हे लक्षात आल्याने उपायुक्त माकणिकर यांनी लगेच आरोपींना लगेच त्या दोघांना पोलीस वाहनात बसवून पोलीस ठाण्यात नेले. येथे काही क्षणांची गफलत झाली असती तर या दोघांचा संतप्त जमावाने अक्कू बनविला असता.
गणेशपेठ ठाण्याचा स्वैर कारभार
गणेशपेठ पोलीस ठाण्याचा कारभार बेताल झाला आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू, जुगार, मटका अड्डे आणि एका बारमधील डान्स पोलिसांच्या आशीर्वादाने बिनबोभाट सुरू आहे. हप्तेखोरीसाठी चटावलेले पोलीस अवैध धंदे करणा-या तसेच गुंडांविरुद्ध येणा-या तक्रारीकडे कमाईचे साधन म्हणून बघतात. तक्रार आल्यानंतर संबंधिताला बोलवून त्याच्या खिशाचे मोजमाप घेतात. अनेकांकडून हप्ता वाढवण्याची बोलणी होते. तक्रारकर्त्याच्या हातात एनसीची पावती देऊन त्याला रवाना केले जाते. या एकूणच प्रकारामुळे या भागातील गुंड निर्ढावले आहेत. त्याचमुळे अवघ्या तीन आठवड्यात गणेशपेठ भागात दोन घटना घडल्या आणि गुन्हेगारांनी वाहनांसोबतच यावेळी दुकानांचीही तोडफोड करून हैदोस घातला. वरिष्ठांनी गणेशपेठ ठाण्याच्या बेताल कारभारावर लक्ष दिले नाही तर भयावह गुन्हा घडू शकतो.