वृद्धाश्रम नव्हे, या तर ‘समाधान’ देणाऱ्या माणुसकीच्या भिंती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 00:28 IST2021-03-08T00:27:40+5:302021-03-08T00:28:24+5:30
पल्लवी हुमनाबादकरांनी उभारले ज्येष्ठांसाठी अनोखे घर

वृद्धाश्रम नव्हे, या तर ‘समाधान’ देणाऱ्या माणुसकीच्या भिंती...
बालाजी देवर्जनकर
नागपूर : ‘आज्जू जेवलीस का गं? आजोबा काय हवंय तुम्हाला. टीव्ही लावू का? चेस, कॅरम खेळायचाय का, की सापशिडी आणू? बाहेर गार्डनमध्ये फिरायला जाऊयात का? मी आहे ना सोबत.’ आजारग्रस्त, दुर्धर व्याधींनी ग्रस्त असलेल्या आजी-आजोबांच्या नागपुरातील हक्काच्या घरातील हा रोजचा संवाद. या मायेच्या घराचे नाव आहे ‘समाधान.’ पल्लवी हुमनाबादकर यांनी उभारलेल्या माणुसकीच्या या भिंतींआड जगताना या ज्येष्ठांना आगळे समाधान लाभते. मुलगी, सून होऊन काळजी घेणाऱ्या पल्लवी जणू त्यांच्या वार्धक्याची काठी बनल्या आहेत. महिला दिनी त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम.
प्रसिद्धीपासून दूर सोमलवाड्यातील पायोनिअर सोसायटीतील क्रमांक ३५ या घरावर तुम्हाला कुठलाही फलक दिसणार नाही. पल्लवी यांचे पती सुजित मुंबईला कंपनीत नोकरी करायचे. काही वेगळे करायला हवे, असा ध्यास घेऊन दोघांनीही मुंबई सोडली अन् जगण्याचे ‘समाधान’ शोधले.
आता विदर्भच नव्हे तर पुण्या-मुंबईतूनही त्यांना कॉल येतात. ‘समाधान’ हे वृद्धाश्रम मुळीच नाही, रुग्णालयही नाही. पण, मानसिक आधाराचे आनंददायी घर नक्कीच आहे. मुलगा, मुलगी किंवा सून यांना नको म्हणून त्यांना या ठिकाणी सोडले असावे, असे तुम्हाला वाटेल. जण तसे मुळीच नाही. उच्चपदस्थ राहिलेले तसेच सामान्य घरातील अनेक वृध्द येथे आयुष्याची सायंकाळ व्यतीत करीत आहेत. सर्वांची काळजी इथे घरासारखीच घेतली जाते.
समाधानाच्या शोधात, गोव्याहून नागपुरात
‘समाधान’मध्ये सेवा देणाऱ्या मीरा आजी तशा मूळच्या गोव्यातील. पण, त्यांना सेवेची आवड. त्यांना वयोवृद्धांची सेवा करायची होती. नागपूरचे ’समाधान’ आवडले. त्याही सेवेत मग्न असतात. चहापासून ते त्यांच्या आवडीनिवडीच्या चविष्ट जेवणाची काळजी त्या घेतात. समाधानच्या त्या ‘अन्नपूर्णा’च आहेत.
त्यांना इथे आल्यानंतर घराची आठवणही येत नाही
अल्झायमर, कॅन्सर, मानसिक आजाराने ग्रस्त, अपघातग्रस्त, पॅरालिसिस अशा अनेक दुर्धर व्याधी असलेले, अगदी व्हेंटिलेशनवर असलेले आजी-आजोबा इथे येतात. वार्धक्य म्हटलं की त्यांच्या प्रत्येक आवडीनिवडी जपाव्या लागतात. त्यांच्या कलाने सगळे करावे लागते.
समाधान हे आहे की त्यांना इथे आल्यानंतर घराची आठवण येत नाही. आजवर पन्नासहून अधिक जण इथे राहिलेत, राहून घरी गेले आहेत. राहणाऱ्यांना वयाचे बंधन नाही. सर्वांच्याच सेवेसाठी नर्सेस, अटेंडेंट आहेत. कॉलवरील डॉक्टर सेवा देतात, असे पल्लवी सांगतात.