लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या सर्वत्र कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागपूर शहरही रेड झोनमध्ये आहे. अशा स्थितीत शहरातील कोणतीही शाळा सुरू करणे धोक्याचे ठरेल. या काळात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दखल घेतली जात आहे. त्यामुळे शाळांनी स्वत: ऑनलाईन शिक्षणासाठी ‘प्लॅटफॉर्म’ तयार करून शाळा सुरू न करताही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार मनपा हद्दीतील शाळा सुरू करण्यासंदर्भात विशेषत: प्रतिबंधित क्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार मनपा आयुक्तांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्यापूर्वी शाळांद्वारे करावयाच्या तयारीसंदर्भात गुरुवारी आयुक्तांनी शहरातील खासगी शाळा संचालक, सचिव व मुख्याध्यापकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. शहरातील सुमारे एक हजार शाळांच्या प्रतिनिधींनी ऑनलाईन चर्चेत सहभाग घेतला. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना टीव्ही किंवा रेडिओवर उपलब्ध होणारे शैक्षणिक कार्यक्रम दाखविण्यासाठी किंवा ऐकविण्यासाठी पालकांना प्रवृत्त करावे. कोविड संदर्भातील दिशानिर्देशाचे पालन करून सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर पाठ्यपुस्तके उपलब्ध करावे, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले.५४ टक्के विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईलसर्वेक्षणानुसार इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या ५४ टक्के विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल व सेट टॉप बॉक्ससह टीव्हीची व्यवस्था आहे. उर्वरित २२.४१ टक्के विद्यार्थ्यांकडे दोन्ही व्यवस्था नाही. इयत्ता सहावी ते आठवीच्या ६५ टक्के विद्यार्थ्यांकडे दोन्ही व्यवस्था आहे तर ३२ टक्के विद्यार्थी वंचित आहेत. माध्यमिक गटात इयत्ता ९ ते १२ वी च्या ७२ टक्के विद्यार्थ्यांकडे दोन्ही सुविधा आहेत तर २१.३७ टक्के विद्यार्थ्यांकडे नाहीत. प्राधान्याने इयत्ता ९ ते १२ चे वर्ग सुरू करावयाचे आहेत.स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवकांची मदत घेणारअशा स्थितीत प्रत्येक शाळांमधील तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही, परंतु इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे हे अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे. या विद्यार्थ्यांसह इतरही विद्यार्थ्यांना ऑनलाईन व इतर दूरस्थ पद्धतीने शिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवकांचे सहकार्य घेण्याबाबत प्रयत्न सुरू आहे, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.
शाळा नाही, शिक्षण सुरू करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 01:17 IST