‘कोरोना’काळात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ नाहीच : राजकीय नेत्यांनी ‘संयम’ पाळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:46 IST2020-07-29T00:44:08+5:302020-07-29T00:46:56+5:30
लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या नेतेमंडळींना आंदोलनाच्या नादात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा मात्र सोयीस्कररीत्या विसर पडतो आहे. नेतेच ‘कोरोना’बाबतीत खबरदारी घेत नसल्याने कार्यकर्तेदेखील त्यांचीच री ओढताना दिसून येत आहेत. अशा स्थितीत हे राजकारणी ‘कोरोना वाहक’ तर होणार नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘कोरोना’काळात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ नाहीच : राजकीय नेत्यांनी ‘संयम’ पाळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे ‘कोरोना’चा प्रकोप सुरू असताना उपराजधानीत राजकीय वातावरणदेखील तापलेले दिसून येत आहे. विविध मुद्द्यांवरून आंदोलने करण्यात येत आहे. मात्र लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या नेतेमंडळींना आंदोलनाच्या नादात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा मात्र सोयीस्कररीत्या विसर पडतो आहे. नेतेच ‘कोरोना’बाबतीत खबरदारी घेत नसल्याने कार्यकर्तेदेखील त्यांचीच री ओढताना दिसून येत आहेत. अशा स्थितीत हे राजकारणी ‘कोरोना वाहक’ तर होणार नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘कोरोना’चा प्रकोप सुरूच असल्यामुळे सर्वांनी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करावे व तसेच ‘मास्क’ घालावेत अशा वारंवार सूचना देण्यात येत आहेत. खुद्द राजकीय पक्षांचे नेतेदेखील यासंदर्भात सूचना करताना दिसून येतात. मात्र आंदोलन किंवा बैठकांदरम्यान मात्र त्याचा विसर पडत आहे. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी राज्यातील विविध ठिकाणी राजभवनासमोर निदर्शने केली. या आंदोलनात आजी व माजी मंत्र्यांसह विविध पदाधिकारीदेखील सहभागी झाले होते. मात्र यावेळी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा पार फज्जा उडाल्याचे चित्र होते. शिवाय अनेक जण ‘मास्क’ न घालता वावरत असल्याचे चित्र होते. अशा गर्दीत एखादा जरी व्यक्ती कोरोनाबाधित असला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
केवळ काँग्रेसच नव्हे तर भाजपकडूनदेखील ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन होत नसल्याची स्थिती आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठविण्याची मोहीम सुरू आहे. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्रित येताना ‘कोरोना’च्या बाबतीत काळजी घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
सामाजिक संघटनांनीदेखील ‘डिस्टन्सिंग’ पाळावे
केंद्र सरकारविरोधात संघप्रणित ‘भामसं’कडून ‘सरकार जगाओ’ मोहीम राबविण्यात येत आहे. यात होत असलेल्या निदर्शनांमध्ये लोक जवळजवळ उभे राहून घोषणा देत आहेत. अनेक जण तर ‘मास्क’ न घालता वावरत आहेत. अद्याप ‘कोरोना’चा धोका संपलेला नाही याचा त्यांना विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.