कोणीही थांबलं नाही... मृत पत्नीला दुचाकीला बांधून पतीचा दुर्दैवी प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:49 IST2025-08-11T12:47:59+5:302025-08-11T12:49:18+5:30

Nagpur : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर धक्कादायक प्रकार

No one stopped... Husband's unfortunate journey with his dead wife tied to a bike! | कोणीही थांबलं नाही... मृत पत्नीला दुचाकीला बांधून पतीचा दुर्दैवी प्रवास!

No one stopped... Husband's unfortunate journey with his dead wife tied to a bike!

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
भरधाव ट्रकच्या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू... महामार्गावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती... पती अमित यादवने डोळ्यांतून अश्रू पुसत हात जोडून वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न केला; पण कोणीही थांबले नाही. शेवटी हताश पतीने पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीला बांधला आणि घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. जणू माणुसकी मेली की काय, अशी वेदनादायक घटना नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मोरफाट्यावर रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.


ग्यारसी अमित यादव (३१) हिचा पतीसोबतच्या प्रवासात दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. पाऊस कोसळत होता, महामार्गावर गाड्यांची वर्दळ होती. पण मृतदेह उचलून मदत करणारा एकही हात पुढे आला नाही. त्याने तिचा मृतदेह चक्क मोटारसायकलवर मागे बांधला आणि सुसाट वेगाने निघाला. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि. १०) सायंकाळी घडला. पोलिसांनी या घटनाक्रमाची व्हिडिओ क्लिप तयार केली.


ग्यारसी अमित यादव ही मूळची करणपूर, जिल्हा सिवनी, मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. ती मागील १० वर्षापासून पती अमित भुरा यादव (३५) याच्यासोबत कोराडी नजीकच्या लोणारा येथे राहायची. रक्षाबंधन असल्याने ती पतीसोबत एमएच-४०/डीबी-१९८३ क्रमांकाच्या मोटारसायकलने लोणारा येथून देवलापारमार्गे करणपूरला जात होती.


दरम्यान, देवलापार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास मागून वेगात आलेल्या ट्रकने (आयशर) त्यांच्या मोटारसायकलला कट मारला व ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिच्या मृत्यू झाला. त्याचवेळी जोरात पाऊस सुरू असल्याने अमितने नागरिकांना मदत मागितली. कुणीही मदत करायला तयार नसल्याने त्याने तिचा मृतदेह चक्क मोटारसायकलवर मागे बांधला आणि कोराडीच्या दिशेने निघाला.


दरम्यान, या प्रकाराची माहिती कोराडी पोलिसांना मिळाली. महामार्ग पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो घाबरला असल्याने कुठेही न थांबता सुसाट निघाला. दरम्यान, पोलिसांनी त्याला अडवून ग्यारसीचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठविला. तपास देवलापार पोलिसांकडे वर्ग करणार असल्याची माहिती कोराडीचे पोलिस उपनिरीक्षक नीलेश शेंडकर यांनी दिली.

Web Title: No one stopped... Husband's unfortunate journey with his dead wife tied to a bike!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.