महसूलच्या बदल्यांसाठी मंत्रालयात चकरा माराव्या लागणार नाहीत : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 06:24 IST2024-12-25T06:24:08+5:302024-12-25T06:24:17+5:30

स्वच्छ कारभाराचा मांडला रोडमॅप

No need to go round the ministry for revenue transfers says Minister Chandrashekhar Bawankule | महसूलच्या बदल्यांसाठी मंत्रालयात चकरा माराव्या लागणार नाहीत : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महसूलच्या बदल्यांसाठी मंत्रालयात चकरा माराव्या लागणार नाहीत : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : बदल्यांसाठी नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना यापुढे मंत्रालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. सर्व बदल्या नियमांनुसार व पारदर्शक पद्धतीने होतील. बदल्यांमधील भ्रष्टाचारावर अंकुश लावला जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

महसूल खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच बावनकुळे यांनी ‘लोकमत’ला भेट दिली. माध्यम सल्लागार रघुनाथ पांडे त्यांच्या सोबत होते. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी ‘लोकमत भवन’मध्ये त्यांचे स्वागत केले. यावेळी बावनकुळे म्हणाले, अधिकाऱ्यांच्या बदल्या, रेतीलिलाव आणि दस्तनोंदणी या तीन प्रमुख मुद्द्यांवर आपण प्राधान्याने काम करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात या अत्यंत महत्त्वाच्या खात्याची नव्याने घडी बसविण्याचा प्रयत्न केला जाईल. 

रेतीला माफियांच्या विळख्यातून सोडविणार

अधिकाऱ्यांकडून विशिष्ट पुरवठादारांना अभय दिले जात असल्यानेच रेतीमाफियांचा धुमाकूळ सुरू असून याच कारणाने त्यांची मजल अधिकाऱ्यांवर वाहने चालविण्यापर्यंत व हल्ल्यांपर्यंत गेली आहे. तेव्हा, बांधकामासाठी गरज असलेली रेती मागणीनुसार सरकारी व्यवस्थेतूनच पुरविली जावी आणि तिचे दर निश्चित असावेत, या दिशेने आपण विचार करीत असून हा सगळा व्यवहार रेतीमाफियांच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

दस्तनोंदणीतील लूट, दलालही संपविणार 

सध्या दस्तनोंदणीसाठी वेगवेगळ्या भागांसाठी कार्यालये नेमून दिली आहेत. जमिनी व मालमत्तांचे खरेदी-विक्री व्यवहार तिथेच नोंदविता येतात. त्यामुळे काही कार्यालयांमध्ये पोस्टिंगसाठी विचित्र स्पर्धा असते. त्यात भ्रष्टाचार होतो. दलालांकडून लूट होते. भूमाफिया तयार होतात. हे टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. 

कोणत्याही ठिकाणी दस्तनोंदणी करता येईल का, यावरही विचार सुरू आहे. कर्नाटक सरकारने यासाठी एक ॲप आणले आहे. त्याचा अभ्यास केला जाईल.
 

Web Title: No need to go round the ministry for revenue transfers says Minister Chandrashekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.