जमीन नाही, म्हणून घर नाही! खापरीतील बेघरांची घरकुलासाठी प्रतीक्षा अखंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:53 IST2025-07-24T14:52:24+5:302025-07-24T14:53:48+5:30
Nagpur : दोन वर्षांपासून घराची वाट बघणाऱ्या खापरीतील गरजूंचं प्रशासनाला साकडं

No land, no house! The homeless in Khapri wait endlessly for a house
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारच्या ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत हजारो पात्र बेघर लोकांकडे जमीन नसल्यामुळे त्यांना घरकुलाचा लाभ मिळत नाही. 'पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाहाय्य योजना' असूनही शासन व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे खापरी परिसरातील बेघर नागरिक दोन वर्षापासून घराच्या आशेवर थांबले आहेत.
भूमिहीनांना घरकुल योजनेचा लाभमिळावा, यासाठी शासनातर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजना, शासकीय जमीन विनामूल्य देण्याची योजना व अतिक्रमण नियमितीकरण योजना राबविली जाते. पण, प्रत्यक्षात एकाही योजनेतून लाभार्थ्यांना जमीन मिळत नसल्याचे वास्तव आहे. कोराडी येथे राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शहर विकास मंचच्या शिष्टमंडळाने अनिल वासनिक व युवराज फुलझेले यांच्या नेतृत्वात भेट घेऊन खापरी परिसरातील बेघरांनी निवेदन सादर करून तत्काळ जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शिष्टमंडळात पदाधिकाऱ्यांसह पात्र अर्जधारक सहभागी होते.
"ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांनाच लाभ?"
असे असूनही, प्रशासन फक्त जमीनधारक लाभार्थ्यांनाच प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देत आहेत, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बेघरांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत.
कामठी तालुक्यातील बेघर वंचित!
कामठी तालुक्यातील खापरी ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी यादी सादर केली गेली, तरीही जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र ठरूनही जमिनीअभावी घरकुल मिळाले नसल्याची माहिती शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक यांनी दिली.