'नो-फ्लाय झोन'चा परिणाम विमानांवर; दोन नागपूर-दिल्ली विमाने २६ पर्यंत रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:18 IST2026-01-21T14:17:43+5:302026-01-21T14:18:39+5:30
Nagpur : दिल्ली येथे २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर काही भाग 'नो-फ्लाय झोन' जाहीर करण्यात आला आहे.

'No-fly zone' affects flights; Two Nagpur-Delhi flights cancelled till 26th
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :दिल्ली येथे २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर काही भाग 'नो-फ्लाय झोन' जाहीर करण्यात आला आहे. त्याचा परिणाम दिल्ली-नागपूर हवाई मार्गावर झाला आहे. हवाई सुरक्षेवरील निर्बंधांमुळे एअर इंडियाच्या दिल्ली-नागपूर दरम्यानची दोन उड्डाणे तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आली आहेत. मात्र, इतर उड्डाणे त्यांच्या निश्चित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत.
एअर इंडियाची दिल्ली-नागपूर फ्लाईट नंबर एआय ४१५ दिल्ली विमानतळावरून सकाळी ६:२० वाजता उड्डाण घेऊन सकाळी ८:५ वाजता नागपूर विमानतळावर पोहोचते. हे विमान पुढील सहा दिवसांसाठी रद्द राहणार आहे. त्याचप्रमाणे नागपूरहून दिल्लीकडे जाणारी एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय ४१६ सकाळी ८:४० वाजता नागपूरहून झेपावते आणि सकाळी १०:३० वाजता दिल्लीला पोहोचते. हे विमानही सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आले आहे.
नागपूर-दिल्ली दरम्यान दररोज एकूण १६ विमानं असतात. यामध्ये एअर इंडियाचे ४ तर इंडिगो एअरलाइन्सच्या १२ विमानांचा समावेश आहे. दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी लागू करण्यात आलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे नागपूर-दिल्ली मार्गावरील २ विमान प्रभावित झाली आहेत. इतर उड्डाणांवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. तथापि, काही विमान विलंबाने उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रिहर्सल आणि सुरक्षा
प्रजासत्ताक दिनाच्या परेडची रिहर्सल आणि सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीच्या हवाई क्षेत्रात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे देशांतर्गत विमानसेवा देणाऱ्या प्रमुख विमान कंपन्यांनी २६ जानेवारीपर्यंत त्यांच्या काही नियमित उड्डाण सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
"दिल्ली विमानतळावर 'नोटिस टू एअरमेन' पुढील सहा दिवसांसाठी सकाळी १०:२० ते दुपारी १२:४५ या वेळेत लागू राहणार आहे. २६ जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यानंतरच विमानसेवा पूर्ववत होणार आहे. याच कारणामुळे नागपूरहून एअर इंडियाची काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मात्र, दिल्लीला ये-जा करणाऱ्या इतर उड्डाणांवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही."
- आबिद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल