पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला तीन वर्षे कारावासाची शिक्षा
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: December 1, 2025 16:11 IST2025-12-01T16:10:42+5:302025-12-01T16:11:21+5:30
Nagpur : पाकिस्तानसाठी हेरगिरी करून भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व व अखंडता धोक्यात टाकणारा ब्रह्मोस एयरोस्पेस कंपनीचा देशद्रोही अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवाल (२८) याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी तीन वर्षे कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली.

Nishant Agarwal sentenced to three years in prison for spying for Pakistan
नागपूर :पाकिस्तानसाठी हेरगिरी करून भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व व अखंडता धोक्यात टाकणारा ब्रह्मोस एयरोस्पेस कंपनीचा देशद्रोही अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवाल (२८) याला मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने सोमवारी तीन वर्षे कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर व प्रवीण पाटील यांनी हा निर्णय दिला.
निशांत नेहरूनगर, रुडकी, जि. हरिद्वार (उत्तराखंड) येथील मुळ रहिवासी असून तो भारत व रशियाचा संयुक्त उपक्रम असलेल्या ब्रह्मोस एयरोस्पेस कंपनीच्या नागपूरातील प्रकल्पामध्ये सिस्टिम इंजिनियर पदावर कार्यरत होता आणि उज्ज्वलनगर येथे भाड्याच्या घरात राहत होता. सत्र न्यायालयाने त्याला ३ जून २०२४ रोजी माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६-एफ अंतर्गत जन्मठेप, शासकीय गुपिते कायद्यातील कलम ३(१)(सी) अंतर्गत १४ वर्षे सश्रम कारावास तर, कलम ५(१)(ए)(बी)(सी)(डी) आणि कलम ५(३) अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध अग्रवालने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यात हा निर्णय देण्यात आला. सरकारच्या वतीने ॲड. संजय डोईफोडे व ॲड. अनुप बदर तर, अग्रवालतर्फे वरिष्ठ ॲड. सुनील मनोहर यांनी बाजू मांडली.
लखनौ एटीएस पथकाची कारवाई
पाकिस्तानमधून नेहा शर्मा व पूजा रंजन या नावाने फेसबुक तर, सेजल कपूर नावाने लिंक्ड-इन अकाऊंट संचालित केले जात होते. अग्रवालसह भारताच्या सुरक्षा विभागातील काही कर्मचारी या गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याची माहिती लखनौ एटीएस कार्यालयाला मिळाली होती. त्यानंतर अग्रवालला ८ आक्टोबर २०१८ रोजी अटक करण्यात आली.