Newspaper distribution will begin from Friday | शुक्रवारपासून सुरू होणार वृत्तपत्र वितरण

पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत विदर्भ डेली न्यूज पेपर्स असोसिएशन तसेच नागपूर वृत्तपत्र विक्रेता संघटना यांच्यात झालेल्या बैठकीत ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी वृत्तपत्रांची भूमिका मांडली. यावेळी विभागीय आयुक्त संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह विदर्भ डेली न्यूज पेपर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृण चांडक, नागपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रमेश नागलकर, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी हे प्रामुख्याने उपस्थित होते.

ठळक मुद्देविदर्भ डेली न्यूज पेपर असोसिएशन व हॉकर्सची बैठक : पालकमंत्रीदेखील उपस्थित

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये नेमकी माहिती जाणे आवश्यक आहे. त्यामुळेच शुक्रवारपासून शहरात वृत्तपत्रांचे वितरण सुरू होणार आहे. यासंदर्भात विदर्भ डेली न्यूज पेपर असोसिएशन व हॉकर्सची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. वृत्तपत्रांचे वितरण आवश्यक असून हॉकर्सनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीला ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, विदर्भ डेली न्यूज पेपर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृण चांडक, नागपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रमेश नागलकर यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, माहिती संचालक हेमराज बागुल, दैनिक हितवादचे राजेंद्र पुरोहित, दैनिक नवभारतचे निमिष माहेश्वरी, दैनिक भास्करचे सुमित अग्रवाल, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी प्रामुख्याने उपस्थित होते.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे नागपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या प्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घेऊन वृत्तपत्राचे वितरण सुरू करावे. वृत्तपत्र वितरण करताना संसंर्ग टाळण्याच्या दृष्टीने साबणाने हात धुणे, मास्क लावणे त्यासोबत योग्य अंतर ठेवणे आदी खबरदारी आवश्यक आहे. प्रशासनाच्या वतीने सर्व केंद्रांवर अंतर ठेवण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन नितीन राऊत यांनी केले.
याप्रसंगी हॉकर्स प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली. सद्यस्थितीत हॉकर्स प्रतिनिधींची स्वत:ची सुरक्षा, तसेच कॉलनी, अपार्टमेंट इतर भागातील नागरिकांनी वृत्तपत्रे घेण्यास दिलेला नकार हे मुद्दे मांडले. हॉकर्सला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक काळजी घ्यावी लागणार आहे. वृत्तपत्र वितरणाच्या वेळी सामाजिक अंतर ठेवावे लागेल, चौकात वितरण करताना वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची खात्री करून घ्यावी लागेल.

नागरिकांनी वृत्तपत्र विक्रेत्याला येऊ द्यावे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता वृत्तपत्र हे समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. वृत्तपत्रामुळे ‘कोरोना’ होत नाही. त्यामुळे जनतेने आपल्या घरी वृत्तपत्र विक्रेत्याला येऊ द्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. हॉकर्स प्रतिनिधींच्या वैयक्तिक आरोग्यासंदर्भात वृत्तपत्र मालकांनी बैठक घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा प्रदान करावी. हॉकर्स प्रतिनिधींच्या सुरक्षाविषयक कामकाजाविषयक स्थानिक स्वरूपाच्या मागण्यांसंदर्भात जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन आवश्यक ते सहकार्य करेल, असे त्यांनी निर्देश दिले.

Web Title: Newspaper distribution will begin from Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.