शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
3
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
4
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
5
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
6
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
7
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
8
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
9
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
10
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
11
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
14
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
15
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
16
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
17
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
18
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
19
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...

नवरात्रीच्या नवदुर्गा : नवतेजाने झळाळत निघाल्या ‘वुमेन ऑन व्हिल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2022 12:09 IST

नारी शक्तीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून नऊ दिवस नऊ क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची ओळख ‘लोकमत’ वाचकांना करून देत आहोत.

नागपूर : ‘या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:’ देवीच्या शक्तिंना नमन करणारा हा श्लोक आजच्या सशक्त आणि संघर्षशील महिलांना प्रतिबिंबित करतो. देवीच्या नऊ स्वरूपांमध्ये नऊ शक्ती असल्याचे मानले जाते.

महिला ही जननी आहे. तिच्यात जन्मत:च या नऊही शक्ती असतात. मनाने कोमल असलेल्या, प्रेम, वात्सल्य, कारुण्य आणि ममतेचे हृदय असणाऱ्या महिला प्रसंगी रणचंडिकेचाही अवतार धारण करतात. आलेल्या संकटावर मात करीत नवा अध्याय रचतात. आपल्यामध्ये असलेल्या कर्तृत्त्वाच्या बळावर यशाचे नवे शिखर गाठतात.

आजच्या युगात वावरणाऱ्या नारीने आपल्यात असलेली ही शक्ती ओळखली आहे. माॅ दुर्गेसारखेच कठीण आणि विपरीत परिस्थितीशी सामना करत नव्या युगाची सृजनात्मक मांडणी करण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. या नारी शक्तीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून नऊ दिवस नऊ क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची ओळख ‘लोकमत’ वाचकांना करून देत आहोत.

शिकतानाच ‘त्यांनी’ संकल्प केला होता, रेल्वे चालवायचीच !

म्हणतात ना, इच्छा तेथे मार्ग ! असेच काहीसे माधुरी मनीष कुराडे यांच्याबाबतीत घडले. बालवयापासूनच 'कुछ हट के कर दिखाना है', अशी जिद्द त्यांनी बाळगली होती. या इच्छेला पुढे धुमारे फुटले. महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी चक्क रेल्वे चालविण्याचा संकल्प बांधला. मनाशी खूणगाठ बांधली. त्यानुसार तयारी चालविली. शिक्षण पूर्ण होताच अवघ्या २१ व्या वर्षी रेल्वेत असिस्टंट लोको पायलट म्हणून त्यांनी नोकरी मिळवली. १९९३ ते २००३ पर्यंत असिस्टंट म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर माधुरी यांची २००३ मध्ये लोको पायलट म्हणून निवड झाली. तेव्हापासून त्या हजारो प्रवाशांच्या जीविताची काळजी वाहत, त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवत आहेत. आज त्या ५० वर्षे वयाच्या आहेत. सर्वसाधारण सामान्य महिलेसारखेच त्यांचेही वर्तन. पती मनीष आर्किटेक्ट. मुलगी आणि मुलगा शिक्षण घेतात. इतर महिलांसारखाच कुटुंबाचा गाडा हाकत त्या चक्क रेल्वे चालवितात, याचा त्यांचे कुटुंबीय अन् नातेवाइकांनाच नव्हे तर शेजाऱ्यांनाही मोठा अभिमान आहे.

वंदनाताईच्या ऑटोला सारेच देतात मान

इंदोरा येथील मॉडेल टाऊन परिसरातील रहिवासी असलेल्या वंदना सोनटक्के यांचा ऑटो मागील २५ वर्षांपासून शहरात परिचित आहे. सारेच ऑटोचालक त्यांचा आणि त्यांचा ऑटोचा सन्मान करतात. या पुरूषी वर्चस्वाच्या क्षेत्रात पाय रोवताना त्यांना बराच संघर्ष करावा लागला. मात्र परिस्थितीवर मात करून त्या पुढे चालत गेल्या. परिस्थिती गरिबीची. अशातही त्यांना सन्मानाने जगायचे होते. अखेर ऑटो चालविण्याचा पर्याय निवडला. त्यांच्या कुटुंबात एक मुलगा आणि मुलगी आहे. ऑटो चालवून त्यांनी मुलीचे लग्न केले. कोणतेही काम करा, पण प्रामाणिकपणे, जीद्दीने आणि सन्मानाने करा, असा संदेश त्या देतात. मागील २५ वर्षांपासून त्या नागपुरातील प्रवाशांना अविरत सेवा देताहेत. इमानदारीने काम करून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या वंदनाताई अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरल्या आहेत.

धनश्रीच्या भविष्यासाठी प्रीती चालवतेय ई-रिक्षा

आयुष्य म्हटले की संकटे आलीच. परंतु अशा संकटात नाउमेद न होता धाडसाने सामोरे गेलो तर यातूनही मार्ग निघतो. भानखेडा त्रिपटी बुद्ध विहारच्या मागे वास्तव्यास असलेल्या प्रीती लाडे यांनीही संकटावर मात करत जगण्याचा सन्मानपूर्वक मार्ग शोधला आहे. सात वर्षांपूर्वी जगण्याचा आधार तुटल्यावर मोठे संकट उभे झाले होते. स्वत:सह दोन मुलींच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला. मात्र त्या डगमगल्या नाहीत. परिस्थितीपुढे हार न मानता त्यांनी ई-रिक्षा चालविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला बऱ्याच अडचणी आल्या. या क्षेत्रात निभाव लागेल की नाही, अशीही भीती होतीच. मात्र त्या धिराने सामोऱ्या गेल्या. मोठी मुलगी धनश्री आणि लहान मुलीच्या भविष्यासाठी कमरेला पदर खोचून त्यांनी या व्यवसायात पाय रोवले. धनश्री आज पुण्यात हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास करतेय. तर लहान नवव्या वर्गात शिकत आहे.

शाळकरी मुलांची जिव्हाळ्याची ‘सारथी’

साधारणत: स्कूल बस किंवा स्कूल व्हॅनचालकांमध्ये पुरुषांचे वर्चस्व असते. मात्र पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात हिमतीने प्रवेश करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या भारती विजय अग्रवाल या आज शाळकरी मुलांच्या जिव्हाळ्याच्या ‘सारथी’ झाल्या आहेत. पन्नासे लेआऊट येथील निवासी असलेल्या भारती यांचे पती विजय स्कूल व्हॅन चालवायचे. त्यांनी भारती यांना ड्रायव्हिंग शिकविले होते. मात्र अचानक त्यांचा मृत्यू झाला आणि भारती यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा ठाकला होता. मात्र त्यांनी हिंमत न हरता नवऱ्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला व शाळकरी मुलांना शाळेत नेण्याचे व घरी आणण्याचे ठरविले. विशेष म्हणजे त्यांना पालकांनीदेखील प्रोत्साहन दिले. मागील १२ वर्षांपासून अव्याहतपणे त्या हे कार्य करीत आहेत. विशेष म्हणजे पार्टनरशिपमध्येदेखील त्यांच्या गाड्या चालत आहेत. स्कूल व्हॅन चालविताना मुलांच्या सुरक्षेवर त्यांचे विशेष प्राधान्य असते. त्यामुळेच पालक एकदा मुले भारती यांच्या स्कूल व्हॅनमध्ये बसली की निर्धास्त असतात. भारती यांनी आपल्या कर्तृत्वाने महिलांसमोर अनोखा आदर्श प्रस्थापित केला आहे.

सोनम उके करतात गुन्हेगारांचा पाठलाग अन् पीडितांची मदत

सोनम खुशाल उके यांना सामाजिक कार्याची आवड आणि गुन्हेगारांना धडा शिकविण्याची आधीपासूनच खुमखुमी होती. ड्रायव्हिंगचीही खूप आवड होती. या तीनही आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी त्यांनी पोलीस दल निवडले. पाच वर्षांपूर्वी त्या पोलीस दलात दाखल झाल्या. पोलीस वाहन चालक म्हणृून जबाबदारी स्वीकारली. मनासारखे काम मिळाले, अजून काय हवे ! येथे त्या पीडितांची मदत करण्यासोबतच गुन्हेगारांनाही धडा शिकवितात. पोलीस दलात कर्तव्य बजावताना वाहनाने गुन्हेगारांचा पाठलाग करतात. कुठे कोणताही गैरप्रकार घडल्यास, गुन्हा घडल्यास आपल्या सहकारी पोलिसांना त्याठिकाणी तातडीने पोहोचवतात. गुन्हेगारांची धरपकड करण्यासाठीही त्या पुढेच असतात. त्या म्हणतात, मुळात ध्येय निश्चित असावे. आवड हवी आणि मनात जीद्दही हवीच.

मेट्रो रेल्वे चालक निकिता महाजन ठरताहेत तरुणींच्या आयडॉल

रेल्वेगाड्या, मेट्रो, ऑटो चालविणे ही यापूर्वी पुरुषांची क्षेत्र मानली जायची. मात्र, निकिता महाजन यांनी या विचाराला छेद देत यशस्वी मेट्रो रेल्वे चालक म्हणून ओळख मिळविली. निकिता या मूळच्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील रहिवासी आहेत. सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या निकिता यांनी किट्स कॉलेज रामटेक येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंचे शिक्षण पूर्ण केले आहे. मेट्रोच्या एका जाहिरातीमुळे त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. गेल्या साडेतीन वर्षांपासून मेट्रो रेल्वेचे संचालन करीत आहे. निकिताने पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत, आपल्या कर्तृत्वाचा ठसा या क्षेत्रात उमटवला आहे. ‘प्रवासी सुरक्षा सर्वतोपरी’ या सूत्राचे पालन करत शेकडो प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या मेट्रो रेल्वे चालक निकिता महाजन आता आयडॉल ठरल्या असून त्यांना आदर्श मानून अनेक तरुणी या नावीन्यपूर्ण क्षेत्रात आपले करिअर घडविण्यासाठी वळत आहेत.

जिद्दीच्या बळावर विषया बनली पहिली रुग्णवाहिका चालक

लग्नानंतर आपलाही घराला हातभार लागावा म्हणून ‘तिने’ ड्रायव्हिंग शिकले. सोबतच बीएपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले. शासन दरबारी वाहनचालकाच्या जागा निघायच्या, त्यात पास होऊन महिला चालक म्हणून डावलले जायचे. मात्र तिने हिंमत सोडली नव्हती. २०१९ मध्ये आरोग्य विभागाच्या वाहन चालक पदासाठी जागा निघाल्या. तिने अर्ज केला. चालक टेस्टची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यात निवड झालेल्यापैकी ती एकमेव महिला होती. या नवतेजस्विनीचे नाव आहे विषया लोणारे-नागदिवे ! नागपुरातीलच नव्हे तर राज्यातील पहिली रुग्णवाहिका ठरलेल्या त्यांच्याकडे सध्या नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील रुग्णवाहिकेची जबाबदारी आहे. ‘लोकमत’शी बोलताना विषया म्हणाली, संघर्षामुळेच माणूस घडतो, यावर माझा विश्वास आहे. स्वत:च्या कष्टाच्या कमाईत नक्कीच आनंद असतो. तो मी आज अनुभवत आहे.

घराचा गाडा हाकण्यासाठी प्रीती बनल्या ‘कॅब ड्रायव्हर’

पुरुषांच्या क्षेत्रात महिला उणिवेनेच दिसून येतात. असे असले तरी त्यांच्यातील कर्तृत्वाने त्या सर्वांमध्ये उठूनही दिसतात. मानेवाडा येथील रहिवासी ३५ वर्षीय प्रीती अशोक राणे या कॅब ड्रायव्हिंग करतात. अर्थात आपण मोबाईलवर प्रवासासाठी ज्या कॅब बूक करतो, ती कॅब चालविताना एखादी महिला आढळली तर ती महिला दुसरी-तिसरी कुणी नसून, प्रीती राणेच असतील, अशी स्थिती आहे. सांगायचे म्हणजे शहरात मोजून दोन महिला कॅब ड्रायव्हर आहेत. प्रीती राणे यांचे पती २०१७ मध्ये आजाराने दगावले. त्याच सुमारास त्यांनी वाहन घेतले होते, एक ड्रायव्हरही होता. तोच ही कॅब चालवायचा. मात्र, लॉकडाऊननंतर सगळेच उद्ध्वस्त झाले. पगार देणेही कठीण होत होते. तेव्हा स्वत:च कॅब सर्व्हिसमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. आता त्या आई आणि मुलाचा परिवार कॅब सर्व्हिसच्या भरवशावर चालवत आहेत.

आरती सदन २१ वर्षांपासून देताहेत शेकडो महिलांना ड्रायव्हिंगचे धडे

अपघातविरहीत व्यवस्था निर्माण होण्याकरिता शिस्तप्रिय कौशल्यपूर्ण व जबाबदार वाहनचालक निर्माण करण्यासाठी मोटार ड्रायव्हिंग स्कूलची भूमिका महत्त्वाची असते; परंतु हे पुरुषांचे क्षेत्र असल्याने महिलांना ड्रायव्हिंग शिकताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याच अडचणीतून गेलेल्या आरती पराग सदन यांनी स्वत:चे यशोदीप ड्रायव्हिंग स्कूल सुरू केले. मागील २१ वर्षांपासून त्या महिलांना ड्रायव्हिंगचे धडे देत आहे. अनेक लोकांसाठी ‘ड्रायव्हिंग आणि महिला’ हा कायमच विनोदाचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे. म्हणूनच आपण हे क्षेत्र निवडल्याचे त्या सांगतात. या क्षेत्रात कौशल्याची आवश्यकता असते. नीट शिकून, सगळे नियम समजून गाडी चालवावी लागते. महिलांनी इतरांवर अवलंबून न राहता स्वत:हून घराबाहेर पडून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्या सांगतात.

टॅग्स :WomenमहिलाSocialसामाजिकNavratriनवरात्रीnagpurनागपूर