राष्ट्रीय टी-१० टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा होणार नागपुरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:20 IST2025-05-08T12:19:17+5:302025-05-08T12:20:18+5:30
Nagpur : २५ राज्यांतील ९०० खेळाडूंचा सहभाग

National T-10 Tennis Ball Cricket Tournament to be held in Nagpur
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय वरिष्ठ गट पुरुष व महिला तसेच १९ वर्षांखालील मुलमुलींच्या ज्युनिअर गट टी-२० टेनिसबॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नागपुरात ९ ते ११ मे या कालावधीत होत आहे. यात २५ राज्यांतील ९०० खेळाडूंचा समावेश असेल. ४५ मीटर सीमारेषा असलेल्या मैदानात १५० ग्रॅम वजनाच्या टेनिसबॉलने साखळी तसेच बाद फेरीतून स्पर्धेचे आयोजन होणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
विदर्भ आणि नागपूर जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटनेच्या यजमान पदाखाली अजनीच्या लोहमार्ग पोलिस मैदानावर तसेच चक्रधरनगर येथील मैदानावर दररोज एकाचवेळी १६ सामने खेळविले जातील. खेळाडू आणि अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था आमदार निवास येथे राहील. ने-आण करण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली असून, आयोजनस्थळी नास्ता, भोजन आणि इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती विदर्भ संघटनेचे अध्यक्ष अजय हिवरकर यांनी दिली. विधान परिषद सदस्य आ. संदीप जोशी यांच्या हस्ते ९ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. मंदाताई विलास कोबे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विजेत्या-उपवजेत्या तसेच तिसरे स्थान मिळविणाऱ्या संघांना ट्रॉफी तसेच मेडल्स देण्यात येतील. आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आल्याची माहिती हिवरकर यांनी दिली. यावेळी टेनिसबॉल फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. गंगाधरय्या, विदर्भ संघटनेचे सचिव राजकुमार कैथवास, चेअरमन शम्मी करोसिया, नागपूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पार्थ हिवरकर आणि नागपूर शहर संघटनेचे अध्यक्ष विराज कैथवास, सौरभ रंगारी यांची उपस्थिती होती.