द. आफ्रिकेतील ‘मॅरेथॉन’मध्ये नागपूरच्या दोन धावपटूंची चमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:43 AM2018-06-20T10:43:07+5:302018-06-20T10:43:15+5:30

शारीरिक क्षमतेची कसोटी घेणारी जगातील अत्यंत कठीण मॅरेथॉनपैकी एक द. आफ्रिकेतील ९० किलोमीटर अंतराची ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ यशस्वीरीत्या पूर्ण करण्याची किमया आॅरेंजसिटीतील दोन हौशी धावपटूंनी साधली आहे.

Nagpur's two runners shines in south Africa Marathon | द. आफ्रिकेतील ‘मॅरेथॉन’मध्ये नागपूरच्या दोन धावपटूंची चमक

द. आफ्रिकेतील ‘मॅरेथॉन’मध्ये नागपूरच्या दोन धावपटूंची चमक

Next
ठळक मुद्दे९० किमी अंतर वैभव, अमित यांनी पूर्ण केली कॉम्रेड मॅरेथॉन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शारीरिक क्षमतेची कसोटी घेणारी जगातील अत्यंत कठीण मॅरेथॉनपैकी एक द. आफ्रिकेतील ९० किलोमीटर अंतराची ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ यशस्वीरीत्या पूर्ण करण्याची किमया आॅरेंजसिटीतील दोन हौशी धावपटूंनी साधली आहे. धावपटूंचे आकर्षण असलेली कॉम्रेड मॅरेथॉन आव्हानात्मक आणि तितकीच किचकट मानली जाते.
वैभव अंधारे आणि अमित थत्ते यांनी हे अंतर निर्धारित वेळेआधी गाठून युवा धावपटूंसाठी प्रेरणादायी कामगिरी केली. दोघेही प्रो हेल्थ फाऊंडेशन आणि आॅरेंजसिटी रनर्स क्लबचे सदस्य आहेत. दरबन ते पीटरमार्टिजबर्ग या शहरादरम्यान दरवर्षी या अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. प्रत्येक १५ किमी अंतर ठराविक वेळेत पूर्ण केलेच पाहिजे, अशी धावपटूंपुढे अट असते. सर्व टप्पे निर्धारित वेळेत पूर्ण करणारे धावपटू शर्यत पूर्ण करण्यात यशस्वी ठरतात. त्यामुळेच या शर्यतीला ‘द अल्टिमेट ह्युमन रेस’ असेही संबोधले जाते. शर्यत पूर्ण करण्याची निर्धारित वेळ १२ तास होती. वैभवने ११.१९ तासांत ती पूर्ण केली. विशेष असे की वैभव या शर्यतीत दुसऱ्यांदा सहभागी झाला होता. त्याने सलग दुसऱ्यांदा शर्यत पूर्ण करताना २५ मिनिटांनी सुधारणा केली.
व्यवसायाने सिव्हिल अभियंता असलेला अमित थत्ते याने ११.४५ तांस वेळ नोंदवित वैभव पाठोपाठ मध्य भारतात दुसरा धावपटू होण्याचा मान मिळविल्याची माहिती प्रो हेल्थ फाऊंडेशनचे संचालक डॉ. अमित समर्थ यांनी पत्रकारांना दिली. या दोघांसोबतच नागपुरातून सहभागी झालेले धावपटू राजेंद्र जैस्वाल आणि डॉ. संजय जैस्वाल हे मात्र शर्यत पूर्ण करण्यात अपयशी ठरले. ८१ किमी अंतर गाठल्यानंतर पायाच्या मांसपेशी ताणल्या गेल्याने दोघांनाही रेस सोडावी लागली.
या संदर्भात डॉ. समर्थ म्हणाले,‘शर्यतीसाठी सज्ज व्हायला धैर्य लागते. या चौघांनी स्वत:मधील धैर्याचा चांगला परिचय दिला. तयारी म्हणून चार महिने आधीपासून जवळपास १५०० किमी धावण्याचा सराव केला. शिवाय शरीरात लवचिकता यावी यासाठी जिममध्ये व्यायामाचा सराव केला.’ भारतातून जवळपास १२५ जणांनी शर्यतीत भाग घेतल्याची माहिती त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. कॉम्रेड मॅरेथॉनमधील यशामुळे शहरातील व्यावसायिक आणि मास्टर्स गटातील लोक धावण्यातही प्राविण्य मिळवू शकतात, हे सिद्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
व्यायाम आणि धावण्याच्या संस्कृतीत शहरातील नागरिकांनी सहभागी व्हायला हवे, असे समर्थ यांनी आवाहन केले. यावेळी वैभव अंधारे आणि अमित थत्ते, प्रशांत गुर्जर,प्रो हेल्थ फाऊंडेशनच्या संचालक रितू जैन, मुकुल समर्थ यांच्यासह कोच सुनील कापगते आदी उपस्थित होते.

Web Title: Nagpur's two runners shines in south Africa Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.