धक्कादायक! अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणांत नागपूरची ‘नकोशी’ आघाडी; ‘एनसीआरबी’नुसार राज्यात सर्वाधिक गुन्हेदर

By योगेश पांडे | Published: December 5, 2023 12:33 AM2023-12-05T00:33:02+5:302023-12-05T00:41:58+5:30

मागील चार वर्षांपासून महिला अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. २०२१ च्या तुलनेत २०२२ व २०२३ मध्ये महिला अत्याचारात वाढ झाली आहे.

Nagpur's Nakoshi front in cases of abuse of minor girls; According to NCRB, the highest crime rate in the state | धक्कादायक! अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणांत नागपूरची ‘नकोशी’ आघाडी; ‘एनसीआरबी’नुसार राज्यात सर्वाधिक गुन्हेदर

प्रतिकात्मक फोटो

नागपूर : महिलांसाठी सुरक्षित अशी प्रतिमा असलेल्या उपराजधानीतदेखील अल्पवयीन मुली व महिला सुरक्षित नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. मागील चार वर्षांपासून महिला अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. २०२१ च्या तुलनेत २०२२ व २०२३ मध्ये महिला अत्याचारात वाढ झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण जास्त आहे. या गुन्ह्यांमध्ये नागपूरने नकोशी आघाडी घेतली आहे. नागपूरचा राज्यात महिला व देशात चौथा क्रमांक आहे. या आकडेवारीवरून नागपुरातील महिला सुरक्षेचा मुद्दा व स्थानिक पोलिस प्रशासनाची कार्यप्रणाली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

‘एनसीआरबी’ तसेच पोलिस विभागाच्या अधिकृत आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींविरोधात पोक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन्स फ्रॉम सेक्सुअल ऑफन्सेस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. २०२२ साली नागपुरात महिला अत्याचाराचे एकूण २५० गुन्हे दाखल झाले. त्यातील अर्ध्याहून अधिक म्हणजेच १३५ गुन्ह्यांत अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले होते. याचा दर दरहजारी ११ इतका होता. देशात नागपूरहून समोर इंदूर, दिल्ली व लखनऊ हीच शहरे आहेत. राज्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली असता अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा मुंबईतील गुन्हेदर ७.२ व पुण्याचा दर ३.१ इतका आहे.

विनयभंगाचा दर देशात दुसरा

मागील काही कालावधीपासून अल्पवयीन मुलींच्या विनयभंग व लैंगिक छळाचे प्रमाणदेखील वाढले आहे. २०२२ मध्ये अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाचे १११ गुन्हे दाखल झाले. गुन्ह्यांचा दर ९.१ इतका होता व हा आकडा कानपूरनंतर देशात दुसरा होता.
पाटणा, कानपूरहून जास्त महिला अपहरण नागपुरात
एनसीआरबीच्या अहवालातील महिला अपहरणाची आकडेवारीदेखील चिंताजनक आहे. २०२२ मध्ये नागपुरात ३७० प्रकरणांमध्ये ३७२ महिलांचे अपहरण करण्यात आले व याचा दर ३०.३ इतका होता. अपहरणाचा दरदेखील राज्यात सर्वाधिक होता. अपहरणाच्या दराच्या एकूण आकड्यांनुसार नागपूर देशात चौथ्या स्थानी आहे. अगदी बिहारमधील पाटणा व उत्तर प्रदेशमधील कानपूरचा गुन्हेदरदेखील नागपूरहून कमी आहे.

या वर्षीच्या अत्याचारात आणखी वाढ
महिला अत्याचाराची आकडेवारी लक्षात घेतली तर मागील वर्षी दर महिन्याला सरासरी २१ गुन्हे दाखल झाले होते. यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत १८७ अत्याचारांचे गुन्हे नोंदविल्या गेले. दर महिन्याची सरासरी ही २३ हून अधिक होती. पुढील तीन महिन्यांतदेखील हा दर जवळपास कायम राहिला आहे. महिला अत्याचारावर नियंत्रण आणण्याचे पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दावे पोकळ ठरल्याचेच आकडेवारीतून समोर येत आहे.

महिलांसंबंधित गुन्हे (२०२२) गुन्हा : आकडा : गुन्हेदर

महिला अत्याचार : ११५ : ९.४
अल्पवयीन अत्याचार : १३५ : ११.०

अपहरण : ३७० : ३०.३
विनयभंग : २३० : १८.८

विनयभंग (अल्पवयीन) : १११ : ९.११

महिलांसंबंधित गुन्हे (२०२३)

गुन्हा : आकडा

महिला अत्याचार : १८७
अपहरण : ३५९

विनयभंग : ३५२
 

Web Title: Nagpur's Nakoshi front in cases of abuse of minor girls; According to NCRB, the highest crime rate in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.