नागपूरचे हृदय मुंबईला : मेडिकलमध्ये तिसरे ऑर्गन रिट्रायव्हल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 21:02 IST2019-02-15T21:01:38+5:302019-02-15T21:02:41+5:30
अपघातामुळे ब्रेन डेड झालेल्या ३३ वर्षीय नागपूरच्या युवकाचे हृदय मुंबईला तर फुफ्फुस सिकंदराबादमधील रुग्णालयात पाठविण्यात आले. तरुण मुलगा गेल्याच्या दु:खातही नातेवाईकांनी मानवतावादी भूमिका घेतल्यामुळेच पाच रुग्णांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हे तिसरे ‘आर्गन रिट्रायव्हल’ म्हणजे मेंदू मृत व्यक्तीकडून अवयव काढण्याची प्रक्रिया व त्याचवेळी अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली.

नागपूरचे हृदय मुंबईला : मेडिकलमध्ये तिसरे ऑर्गन रिट्रायव्हल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपघातामुळे ब्रेन डेड झालेल्या ३३ वर्षीय नागपूरच्या युवकाचे हृदय मुंबईला तर फुफ्फुस सिकंदराबादमधील रुग्णालयात पाठविण्यात आले. तरुण मुलगा गेल्याच्या दु:खातही नातेवाईकांनी मानवतावादी भूमिका घेतल्यामुळेच पाच रुग्णांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हे तिसरे ‘आर्गन रिट्रायव्हल’ म्हणजे मेंदू मृत व्यक्तीकडून अवयव काढण्याची प्रक्रिया व त्याचवेळी अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली.
राजेश संतोष साहू (३३) रा. त्रिमूर्ती नगर, भामटी असे अवयवदात्याचे नाव.
राजेश व्यवसायाने चालक आहे. १२ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजताच्या सुमारास घरासमोरील रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात असलेल्या एका वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. वाहन चालक न थांबताच पळूनही गेला. लोकांनी त्याला तातडीने मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. मेंदूला जबर मार बसला होता. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, परंतु १४ फेब्रुवारी रोजी राजेशचा मेंदू मृत (ब्रेन डेड) झाल्याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. राजेश हा एकुलता एक मुलगा. त्याच्यावरच घराची जबाबदारी होती. अचानक झालेल्या या घटनेने साहू कुटुंबाला जबर धक्का बसला. परंतु त्या स्थितीतही संयम दाखवित कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी लागलीच यंत्रणा हालवली. ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’ला (झेडटीसीसी) याची माहिती दिली. समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्या मार्गदर्शनात मूत्रपिंड समितीच्या अध्यक्ष डॉ. चारुलता बावनकुळे, यकृत समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर टॉमी व नागपूर झोन कोऑर्डीनेटर वीणा वाठोरे यांनी पुढील प्रक्रिया पार पाडली.
मेडिकल ते विमानतळ ग्रीन कॉरीडोर
ट्रॉमा केअर सेंटरमध्ये शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ‘रिट्रायव्हल’ला सुरुवात झाली. मुंबई येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या चमूने हृदय, तर सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या चमूने फुफ्फुस शितपेटीत ठेवून रुग्णवाहिकेमधून ग्रीन कॉरीडोरच्या मदतीने काही मिनिटांच्या आत विमानतळ गाठले. येथून विशेष विमानाने ते मुंबई व सिकंदराबाद येथे पोहचले. नागपुरातून हृदय जाण्याची हे चौथी घटना आहे. यकृत लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलला तर एक मूत्रपिंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तर एक मूत्रपिंड वोक्हार्ट हॉस्पिटलमधील रुग्णांना देण्यात आले. मेडिकलच्या नेत्रपेढीला नेत्रदान करण्यात आले.