नागपूरची ड्रग्ज तस्करी विधानसभेत गाजली, मोक्का लावण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 14:44 IST2026-03-18T14:43:39+5:302026-03-18T14:44:36+5:30
Nagpur : नागपुरात ड्रग्ज तस्करांवरील कारवाईला गती मिळाली आहे. पोलिस विभागाने डिसेंबर महिन्यात घातलेल्या धाडीत लाखोंचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहे.

Nagpur's drug smuggling scandal hits the assembly, CM announces crackdown
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात ड्रग्ज तस्करांवरील कारवाईला गती मिळाली आहे. पोलिस विभागाने डिसेंबर महिन्यात घातलेल्या धाडीत लाखोंचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहे. ड्रग्ज तस्करांवर एनडीपीएसअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यापुढे ड्रग्ज तस्करांवर मोक्का लावला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
नागपुरात पोलिस विभागाने राबवलेली ऑपरेशन थंडर मोहीम अधिक व्यापक करण्याची मागणी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून प्रवीण दटके यांनी केली. यावर ड्रग्ज तस्करी थांबवण्यासाठी त्यांच्यावर मोक्का लावून राज्यात झीरो टॉलरंस अभियान राबवणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपुरातील ड्रग्ज पेडलर्सचे जाळे शोधण्यासाठी, तसेच त्यांचे इतर राज्यातील कनेक्शन शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, ड्रग्ज तस्करांच्या मालमत्तेचा संपूर्ण अहवाल तयार करून त्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई करावी, त्यांची बँक खाती गोठवावी, अशी मागणी आ. प्रवीण दटके यांनी केली. आ. डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर शहरात ड्रग्जचे जाळे फोफावले असल्याचे सांगत नागपूर पोलिस ड्रग्ज तस्करांवर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप केला.
नागपुरातील विशेषतः उत्तर नागपूरच्या झोपडपट्टी भागात १४ ते १५ वर्षाच्या मुलांचा वापर ड्रग्ज तस्करीसाठी केला जात आहे. वयाने लहान असल्याने पोलिस या मुलांना सोडून देतात, ज्याचा फायदा मुख्य सूत्रधार घेत आहेत. या नशेतूनच परिसरात तलवारी निघत आहेत आणि खुनासारख्या घटना घडत आहेत. पोलिसांकडे माहिती असूनही ते केवळ लहान माशांना पकडतात; पण 'किंगपिन' अद्याप मोकाट कसे, असा सवाल राऊत यांनी केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गुन्हेगार लहान मुलांचा वापर बचावासाठी करत आहेत. अशा गंभीर गुन्ह्यांसाठी बाल गुन्हेगारांचे वय १८ वरून १६ वर्षे करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली जाईल, तसेच डॉ. राऊत यांनी दिलेल्या गोपनीय नावांच्या यादीवर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.