'दिल्लीत जातो अन् निधी आणतो, तुमच्यासारखं...', CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 19:55 IST2023-12-06T19:54:38+5:302023-12-06T19:55:39+5:30
'केंद्र सरकारने आम्हाला निधी दिला, त्यासाठी प्रयत्न करावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो.'

'दिल्लीत जातो अन् निधी आणतो, तुमच्यासारखं...', CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
नागपूर: विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या, म्हणजेच 7 डिसेंबरपासून नागपूर इथे सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचा चहापानाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'ते म्हणतात गेल्या अडीच वर्षात केंद्र सरकारने त्यांना पैसे दिले नाही. तुम्ही मागायला हवे होते. तुमच्या अहंकारामुळे राज्यचे नुकसान केले. अनेक प्रकल्प बंद पाडले, अनेक प्रकल्प स्थगित केले. आमचे सरकार आल्यानंतर ती स्थगिती उठवण्यात आली. ते आम्हाला म्हणाले आम्ही स्वाभिमान हरवला आहे, दिल्लीत जातात, बाहुली आहेत. हो आम्ही दिल्लीला जातो. दिल्लीला जातो अन् निधी आणतो.'
'केंद्र सरकारने आम्हाला निधी दिला. मागितल्या काही शिवाय मिळत नाही. प्रयत्न करावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो. तुमच्यासारखं कडकसिंग बनून चालत नाही. ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची परवानगी नाही, त्यांनी आमच्यावर आरोप करायचे? स्वाभिमानाची भाषा करायची? तुम्ही विकासाच्या बाता करता, पण लोकं सुज्ञ आहेत. आमच्या दोऱ्या मतदारांच्या हातात आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
#LIVE : #नागपूर | विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद https://t.co/iHiaUOSUd0
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 6, 2023
'कोर्टात टीकणारे आरक्षण देणार
यावेळी सीएम शिंदेंनी मराठा आरक्षणावरही भाष्य केले. 'आम्ही आरक्षणाबाबत सुरुवातीपासून सकारात्मक आहोत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आणि इतर कुठल्याही समजावर अन्याय होणार नाही, कुणाचेही आरक्षण कमी होणार नाही, ही भूमिका आमची आहे. सरकारची भूमिका मराठा समाजारा आरक्षण देण्याची आहे. कोर्टात टीकणारे मराठा आरक्षण देण्याचे काम सरकार करेल. सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केले जाईल. मराठा समाजाने सरकारवर विश्वास ठेवावा, असे आवाहनही एकनाथ शिंदेंनी केले.
'विरोधकांसाठी आता सुपारी-पान ठेवू'
सरकारने आयोजित केलेल्या चहा पानावर विरोधकांनी बहिष्टार टाकला. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोला लगावला. विरोधकांना विदर्भ मराठवाड्यासाशी काहीही देणे घेणे नाही, हे त्यांच्या भूमिकेवरून दिसते. विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत काही नेते झोपले होते, जसे ते तीन राज्यात झोपले. आमच्या चहापानावर बहिष्कार घातला, विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पण ठेवावे लागेल, म्हणजे कदाचित ते येतील,' असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.