Nagpur News: नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागात १७ मार्च रोजी रात्री प्रचंड हिंसाचार झाला. वाहनांची जाळपोळ, तोडफोड आणि घरे-दुकाने यांचे नुकसान करण्यात आले. दोन समुदायात झालेल्या या वादाच्या वेगवेगळ्या बाजू समोर येत आहेत. पण, ही घटना ज्यामुळे वाढली, त्या विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनात नेमके काय घडले होते? औरंगजेबाची विटांची कबर आणि कपडा, याबद्दल विहिंपचे राजकुमार शर्मा यांनी घटनाक्रम सांगितला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आंदोलनावेळी हजर असलेले विश्व हिंदू परिषदेचे राजकुमार शर्मा यांनी एएनआयशी बोलताना माहिती दिली. ते म्हणाले, "विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने सात दिवसांआधीच संपूर्ण महाराष्ट्र आंदोलन करण्याचे ठरवले होते. कबर हटवण्याचे आंदोलन होते. त्यामुळे प्रतिकात्मक स्वरूपात तिथे विटांची कबर बनवण्यात आली होती."
ऊर्दूमध्ये लिहिलेलं कुणाला समजेल?
"त्या प्रतिकात्मक कबरीवर एक हिरवा कपडा होता. आता मला सांगा की, त्यावर काही लिहिलेलं असेल... आता महाराष्ट्रात राहणाऱ्या खूप साऱ्या लोकांना मराठी समजत नाही. मग त्या कपड्यावर ऊर्दूमध्ये काही लिहिलेलंही असेल, तर कुणाला काय समजेल?", असे राजकुमार शर्मा म्हणाले.
"हिरवा कपडा जाळला गेला, तर उगाच मुद्दा बनवला"
"तो जो हिरवा कपडा होता, कबरीवर हिरवा कपडा ठेवतात. त्याला जेव्हा तोडले गेले आणि जाळले गेले. तर त्याचा यांनी उगाच मुद्दा बनवला. सकाळी ११.३० वाजता आंदोलन होते. दोन वाजेपर्यंत सगळ्या प्रकरणावर पोलिसांशी चर्चा झाली होती. मुस्लीम समुदायाचे लोक होते. त्यांच्याही हे लक्षात आले होते. पण, त्यानंतर औंरगजेबाच्या काही औलादींनी षडयंत्र रचले. मशिदीत जमले आणि पूर्वनियोजन केले आणि जाळपोळ केली", असा दावा राजकुमार शर्मा यांनी केला.
"प्रशासनाने आमच्यावर कारवाई केली. आमचा काही विरोध नाही. हा देश संविधानानुसार चालेल. पण, हे औरंगजेबाच्या औलांदींनाही समजून घ्यावं लागेल की, हा देश संविधानानुसार चालेल. जर ते रस्त्यावर उतरून जाळपोळ करतील. आमची घरं जाळतील. तर मग त्यांच्यावर का कारवाई होत नाहीये?", असे शर्मा म्हणाले.