नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू मराठा, मागासवर्गीय की खुल्या वर्गातून? पद जातीय समीकरणात रखडल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 14:12 IST2025-10-17T14:10:16+5:302025-10-17T14:12:17+5:30
Nagpur : जातीय समीकरणात मुलाखती रखडल्याची शैक्षणिक वर्तुळात चर्चा

Nagpur University Vice Chancellor Maratha, from backward class or open class? Discussion on the post being stuck in the caste equation
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरुपद जातीय समीकरणात रखडल्याची चर्चा आहे. अंतिम पाच उमेदवारांमध्ये दोन ते तीन उमेदवार खुल्या वर्गातील, एक उमेदवार मागासवर्गातील तर एक उमेदवार मराठा असल्याची माहिती आहे. मराठा उमेदवाराला संधी देऊन या समाजाची मने जिंकायची की शंभर वर्षाच्या इतिहासात मागासवर्गातील उमेदवाराला संधी द्यावी की, खुल्या वर्गाच्या उमेदवाराच्या गळ्यात कुलगुरुपदाची माळ टाकावी, या अडचणीत निवड रखडल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे.
नागपूर विद्यापीठाने त्यांचा शताब्दी वर्ष सोहळा साजरा केला आहे. दिवंगत कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरूंना निलंबित करण्याचा प्रकार झाला होता. शैक्षणिक वर्तुळात विद्यापीठाची बदनामी झाली. त्यामुळे नागपूर विद्यापीठाला तब्बल तीन वर्षांनी विद्यापीठाची प्रतिमा उंचावणारे कुलगुरू मिळावे अशी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची इच्छा आहे. ३ आणि ४ ऑक्टोबरला कुलगुरुपदासाठी २८ उमेदवारांचे सादरीकरण झाले. त्यानंतर पाच उमदेवारांची नावे अंतिम करण्यात आली. मात्र, बारा दिवस उलटल्यानंतरही या उमदेवारांच्या राज्यपालांसमोर मुलाखती झाल्या नाही. पाच नावे अंतिम झाल्यावर राज्यपाल एक ते दोन दिवसांत मुलाखती घेऊन कुलगुरूंच्या नावाची घोषणा केली जाते. मात्र, जातीय समीकरणात कुलगुरुपदाची निवड रखडल्याची चर्चा आहे.
विद्यापीठाच्या शंभर वर्षाच्या इतिहासात आतापर्यंत महिला कुलगुरू मिळालेले नाही. अनेक मुलाखतींमध्ये महिला उमेदवार अंतिम पाचमध्ये असतानाही त्यांची निवड झालेली नाही. याउलट नागपूरमधील डॉ. फडणवीस, डॉ. वंजारी, डॉ. चक्रदेव या महिला उमेदवार राज्याच्या इतर विद्यापीठांमध्ये कुलगुरू झाल्यात. मात्र, नागपूर विद्यापीठाला आतापर्यंत महिला कुलगुरू न मिळाल्याने यावेळी महिलांना संधी मिळण्याची चर्चाही रंगली आहे.