नागपूर ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ; शताब्दीच्या आनंद पर्वात मनोमनी स्वप्न 'टॉप हंड्रेड'चे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 10:55 IST2023-08-04T10:55:07+5:302023-08-04T10:55:07+5:30
नागपूर विद्यापीठाचे शताब्दी पर्व : नवतंत्रज्ञान, संशोधनात हवी गरुडभरारी!

नागपूर ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ; शताब्दीच्या आनंद पर्वात मनोमनी स्वप्न 'टॉप हंड्रेड'चे!
नागपूर : ब्रिटिश राजवटीत मध्य भारतात ४ ऑगस्ट १९२३ रोजी उच्च शिक्षणाचे नवे दालन उघडले. नागपूर, जबलपूर आणि अमरावती येथील सहा महाविद्यालयांपासून सुरू झालेल्या नागपूर विद्यापीठाचा विस्तार आज ५११ संलग्नित महाविद्यालये, ३९ पदव्युत्तर शैक्षणिक विभाग आणि तीन संचालित महाविद्यालयांपर्यंत पोहोचला. शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या विद्यापीठाचा इतिहास गौरवशाली आहे. मात्र, नवतंत्रज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रांत आजही विद्यापीठ देशात पहिल्या शंभर विद्यापीठांत नाही, हा चिंतनाचा विषय आहे.
स्वातंत्र्यलढ्यातही योगदान
१९३८ मध्ये ‘वंदे मातरम्’ चळवळीने जोर धरला. या चळवळीत उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. ‘वंदे मातरम्’ गीत गायले म्हणून या विद्यापीठाने तब्बल ५०० विद्यार्थ्यांना काढून टाकले होते. अशावेळी नागपूर विद्यापीठाने या ५०० निष्कासित विद्यार्थ्यांना आपल्या विद्यापीठात प्रवेश देण्याचा धाडसी निर्णय घेतला.
१९४२ च्या चले जाव चळवळीत भाग घेतल्यामुळे ज्यांच्या अभ्यासात व्यत्यय आला. त्या विद्यार्थ्यांसाठीही विद्यापीठाने पुन्हा परीक्षा घेतली. या विद्यार्थ्यांसाठी विशेष दीक्षांत समारंभही आयोजित केला होता.
१९३८ मध्ये महात्मा गांधी यांना ‘डॉक्टर ऑफ लॉ’
२००५ मध्ये झाले नामकरण
४ मे २००५ पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.
चार अपत्यांची मातृसंस्था
नागपूर विद्यापीठातून डॉ. हरसिंग गौर विद्यापीठ (सागर), राणी दुर्गावती विद्यापीठ (जबलपूर), अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठ, तर गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती झाली.
हे घडले विद्यापीठात...
भारताचे सहावे उपराष्ट्रपती व देशाचे पहिले मुस्लीम मुख्य न्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्ला, पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव, देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासह अनेक मातब्बर राजकारणी, नेते, न्यायाधीश, वकील, सामाजिक कार्यकर्ते व कलावंत या विद्यापीठाने घडविले.
स्वातंत्र्यापूर्वीच सर्वसमावेशकतेचा पाया : महात्मा गांधींना 'एलएलडी', स्वातंत्र्यवीर सावरकरांना डी.लिट.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारलेला अभ्यासक्रम सुरू करणारे हे देशातील पहिले विद्यापीठ होय.
- एका स्वतंत्र विभागाद्वारे महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारलेला अभासक्रम सुरू करण्याचे श्रेयही या विद्यापीठास जाते.
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी २०१२-१३ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन विद्यापीठाने सुरू केले.
- सर जमशेदजी टाटा यांनी दिलेल्या एक लाख रुपयांच्या देणगीतून विद्यापीठाची मूळ वास्तू उभी राहिली.
- विद्यापीठाने ब्रिटिश राजवटीची तमा न बाळगता स्वातंत्र्यलढ्यात अग्रणी असलेल्या नेत्यांना वेळोवेळी आमंत्रित करून व त्यांना सन्माननीय पदव्या बहाल केल्या. १९३८ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ‘डॉक्टर ऑफ लॉ’ ही पदवी बहाल केली.
१९४३ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही सन्मानीय पदवी देऊन आपल्या विद्यार्थी वर्गात प्रविष्ट करून घेतले.
१९३६ च्या दीक्षांत भाषणासाठी सरोजिनी नायडू यांना, १९४४ मध्ये सी. राजगोपालाचारी आणि त्यानंतर दोनच वर्षांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना विद्यापीठाने पाचारण करून स्वतंत्र बाण्याची चुणूक दाखवून दिली.
सुरुवातीला जिथे जागेचा प्रश्न होता तेथे आज २६३ एकर जागेवर विद्यापीठाचा भव्य परिसर आहे.
सर फ्रॅक स्लाय पहिले कुलपती
- नागपूर विद्यापीठाची स्थापना ४ ऑगस्ट १९२३ रोजी झाली. सर फ्रॅक स्लाय हे त्या वेळेचे कुलपती होते. विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू सर बिपिनकृष्ण बोस हे होते. त्यावेळी केवळ सहा महाविद्यालये, ९१७ विद्यार्थी आणि चार विद्याशाखांच्या बळावर विद्यापीठ सुरू झाले.
१९१४ ला झाले होते प्रयत्न
४ ऑगस्ट १९२३ रोजी नागपूर विद्यापीठाची स्थापना झाली. मात्र, १९१४ च्या सुमारास त्या दिशेने पहिले पाऊल पडले. सॅडलर कमिशनच्या अहवालानंतर एका अधिकृत समितीची स्थापना झाली. विद्यापीठाची निर्मिती करण्याबाबत प्राथमिक प्रयत्नांना आरंभ झाला. प्रथम महायुद्धाची झळ पोहोचली असताना १९२० नंतर या प्रयत्नांना पुन्हा चालना मिळाली. छत्तीसगड, जबलपूर, रायपूर, विदर्भ आणि वऱ्हाड प्रांत या विशाल भागासाठी एक विद्यापीठ स्थापन करण्याचे निश्चित झाले.
शताब्दी वर्षात काय केले?
- शताब्दी महोत्सवी वर्षात ३ ते ७ जानेवारी २०२३ दरम्यान इंडियन सायन्स काँग्रेस व १९ ते २१ फेब्रुवारी २०२३ दरम्यान फार्मास्युटिकल सायन्स काँग्रेसचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे २१ सप्टेंबर २२ रोजी ‘स्वातंत्र्यसंग्राम में जनजातीय नायको का योगदान’ या विषयावर भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याच कार्यक्रमात देशात पहिल्यांदाच ट्रायबल सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले.
- शहरी तसेच ग्रामीण भागातील युवकांना व शेतकऱ्यांना लाभ व्हावा, या हेतूने नागपूर विद्यापीठाने १९८८ मध्ये सेंटर फॉर सेलिकल्चर ॲण्ड बायोलॉजिकल पेस्ट मॅनेजमेंट रिसर्च या केंद्राची स्थापना केली.
- अमरावती मार्गावरील विद्यापीठाच्या महात्मा जाेतिबा फुले शैक्षणिक परिसरातील व स्व. पी.व्ही. नरसिंहराव स्मृती ग्रंथालय संशोधक व अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. त्याचप्रमाणे रामदास पेठ परिसरातील डॉ. वि.भि. उपाख्य भाऊसाहेब कोलते विद्यापीठ केंद्र हे अत्यंत दुर्मीळ व मौलिक ग्रंथ संग्रहासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
गौरवशाली लक्ष्मीनारायण तंत्रशिक्षण संस्था
जगभरात विद्यापीठाचा गौरव वाढविण्यात लक्ष्मीनारायण तंत्रशिक्षण संस्थेचा (एलआयटी) मोठा वाटा आहे. आता या संस्थेला लक्ष्मीनारायण अभिनव तंत्र विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला आहे.