Nagpur : 'ब्रह्मा'ला संपवणाऱ्या 'छोटा मटका'ची प्रकृती गंभीर; उच्च न्यायालयाने स्वतःहून घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 14:29 IST2025-08-26T14:29:06+5:302025-08-26T14:29:38+5:30
Nagpur : न्यायालयाने स्वतःच जनहित याचिका केली दाखल

Nagpur: The condition of the 'Chhota Matka' who killed 'Brahma' is critical; High Court takes suo motu cognizance
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील जखमी 'छोटा मटका' वाघाची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असून, वन विभागाचे त्याच्या उपचाराकडे दुर्लक्ष आहे. त्याला आता चालणेही कठीण झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने ही बाब गंभीरतेने घेऊन याविषयी स्वतःच जनहित याचिका दाखल केली आहे.
ताडोबाच्या बफर क्षेत्रात साम्राज्य निर्माण केलेल्या छोटा मटकाची गेल्या बुद्धपौर्णिमेच्या दिवशी 'ब्रह्मा' वाघासोबत लढाई झाली. त्यात ब्रह्मा ठार तर, छोटा मटका गंभीर जखमी झाला. त्याच्या पायाला मोठ्या चिरा पडल्या आणि त्यात सातत्याने रक्त येत होते. परंतु, वन विभागाने त्याच्यावर तातडीने प्रभावी उपचार केले नाही. त्यामुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.
मटकासूर व छोटी ताराचा पुत्र
छोटा मटका हा मटकासूर व छोटी तारा यांचा पुत्र आहे. त्याचा जन्म २०१६ मध्ये झाला. त्याचा भाऊ ताराचंद वीज पडल्यामुळे मरण पावला. छोटा मटकाला छोटी ताराने वाढवून अत्यंत धाडसी बनवले. दरम्यान, मायाला आव्हान दिल्यामुळे मटकासूरने त्याला बाहेर हाकलले होते. त्यानंतर तो २०१८ मध्ये बफर झोनमध्ये परत आला आणि निमढेला, अलिझंझा व नवेगाव परिसरात वर्चस्व प्रस्थापित केले.
अॅड. यश सांबरे न्यायालय मित्र
या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व अजित कडेठाणकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणाचे कामकाज पाहण्यासाठी अॅड. यश सांबरे यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्त्ती केली. तसेच, त्यांना एक आठवड्यात नियमानुसार जनहित याचिका तयार करण्यास सांगितले.
मोगली, बजरंग, ब्रह्मासोबत लढला
छोटा मटका आतापर्यंत मोगली, बजरंग व ब्रह्मासोबत लढला आणि जिंकला. त्याने सुरुवातीला २०२१ मध्ये वयाने मोठा असलेल्या मोगलीला जमीन दाखवली. त्यानंतर २०२३ मध्ये तेव्हापर्यंत अपराजीत असलेल्या बजरंगला यमसदनी धाडले तर, २०२५ मध्ये ब्रह्माला पराभूत केले. मात्र, या लढाईत छोटा मटका स्वतः ही गंभीर जखमी झाला.