नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 22:45 IST2025-07-14T22:45:13+5:302025-07-14T22:45:27+5:30
स्टेशन मास्तर, प्वॉइंट मेनची सतर्कता; भीषण आगीची लागण्याची होती शक्यता

नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: वेळीच तातडीची उपाययोजना केल्यामुळे नंदीग्राम एक्सप्रेसला संभाव्य आग लागण्याची एक भयावह दुर्घटना टळली. सोमवारी सकाळी ९.२३ वाजता पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ ही घडली.
नेहमीप्रमाणे ट्रेन नंबर ११००१ नंदीग्राम एक्सप्रेस आज सकाळी अदिलाबादहून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात प्रवेश करीत होती. सकाळी ९.२० ला ही गाडी पिंपळखुटी स्थानकाजवळ आली असताना स्टेशन मास्तर अमित शिंदे आणि प्वॉइंट मेन हेमराज यांना कोच ए-१ (सीआर १०४६४४)च्या खालून मोठ्या प्रमाणात धूर निघताना दिसला. धोक्याची शंका आल्याने त्यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांसह कोचजवळ जाऊन स्थितीचा अंदाज घेतला. कोच स्प्रिंगच्या वरच्या भागात एक रबरी आवरण असते. त्याला आग लागली होती. त्यामुळे हा धूर निघत असल्याचे दिसून आले. ही आग लगेच राैद्र रूप धारण करू शकते आणि मोठा अनर्थ होऊ शकतो, हे लक्षात आल्यामुळे त्यांनी लगेच लोको पायलट, गार्ड आणि स्टेशन कंट्रोल रूमला माहिती दिली. परिणामी अनेक कर्मचारी रेल्वे स्थानकावरील फायर एक्सटिंग्विशर (अग्निशमन उपकरण) घेऊन घटनास्थळी धावले. ८ ते १० उपकरणाच्या मदतीने सलग अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर आग पूर्णपणे विझल्याची खात्री करून घेण्यात आली. त्यानंतर गार्डस् नी तपासणी केल्यानंतर आगीचा धोका टळल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर सकाळी १०.५ वाजता गाडी पुढे रवाना करण्यात आली.
प्रवाशांमध्ये खळबळ; कर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान
कोच खालू धूर निघत असल्यामुळे आणि रेल्वे कर्मचारी मोठ्या प्रमाणात अग्निशमन उपकरण घेऊन धावपळ करताना दिसल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली होती. मोठ्या संख्येत प्रवासी कोचमधून खाली उतरून स्थितीचा आढावा घेत होते. काही जण आग लागल्याची कुजबूज करीत होते. गोंधळ उडू नये म्हणून प्रसंगावधान राखत रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत, आश्वस्त केले.
आग नव्हे तर तांत्रिक समस्या : अमन मित्तल
या संबंधाने रेल्वेचे विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ही घटना 'आग नव्हे तर तांत्रिक समस्या' असल्याचे म्हटले. ब्रेक ब्लॉकच्या घर्षणामुळे धूर निघत होता, असेही ते म्हणाले.