नागपुरात आमदार रवी राणांविरोधात शिवसेनेची पोलिसांत तक्रार; कळमना ठाण्यावर काढला मोर्चा
By कमलेश वानखेडे | Updated: September 14, 2022 18:15 IST2022-09-14T18:13:32+5:302022-09-14T18:15:47+5:30
उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप करणे थांबवा; कळमना पोलीस ठाण्यासमोर शिवसैनिकांचे आंदोलन

नागपुरात आमदार रवी राणांविरोधात शिवसेनेची पोलिसांत तक्रार; कळमना ठाण्यावर काढला मोर्चा
नागपूर : आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत या विरोधात नागपूर शहर शिवसेनेने कळमना पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. राणा यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते कळमना येथील चिखली चौकात जमले. तेथून कळमना पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. राणा दाम्पत्य हे हेतुपुरस्सर खोटे आरोप करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र आखत आहेत. अमरावतीच्या पुढील खासदार राणा होतील, हे भाजपने जाहीर केल्यामुळे नवनीत राणा या हवेत आहेत. त्यामुळेच त्या पोलिसांशी देखील दुर्व्यवहार करीत आहेत, असा आरोप करीत त्यांनी हे प्रकार थांबविले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
७ कोटींची वसुली अन् उद्धव ठाकरे कनेक्शन; आ. राणांचे अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप
आंदोलनात सुरेश साखरे, मुन्ना तिवारी, नितीन नायक, अंगद हिरोंदे, विशाल कोरके, आशा इंगले, पूजा गुप्ता, नीलिमा शास्त्री, ज्ञानलाता गुप्ता, वैशाली खराबे, विजय शाहू, मुकेश रेवतकर, ललित बावनकर, दीपक पोहनेकर, भूपेंद्र कथाने, प्रीतम कापसे, अब्बास अली, शशिधर तिवारी, आदींनी भाग घेतला.