Nagpur Rape crime news: उपराजधानी नागपूरमध्ये बलात्काराच्या एका घटनेने खळबळ उडाली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षाच्या मुलीवर तिच्या ओळखीतील एक तरुणासह त्याच्या दोन मित्रांनी सामूहिक बलात्कार केला. ५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. यात एका आरोपीला अटक केली आहे, तर इतर दोघे अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन पीडित मुलगी ही अकरावीचे शिक्षण घेत आहे. तर आरोपी १२वीचा विद्यार्थी आहे. दोघेही एकमेकांना ओळखत होते. आरोपीने पीडित मुलीसोबत यापूर्वी अश्लील वर्तन केले होते, अशी माहितीही समोर आली आहे.
घरी बोलावलं, खोलीत नेऊन अत्याचार केले; नंतर...
पीडित मुलगी आरोपीने अश्लील वर्तन केल्याने त्याला टाळत होती. पण, तो तिला वारंवार मेसेज करतच होता. आरोपीने मुलीला मेसेज केला आणि घरी बोलावलं. स्वतःच्या घरीच भेटायला बोलावलं आहे. त्याच्या घरचेही असतील म्हणून मुलगी भेटायला तयार झाली.
५ फेब्रुवारी रोजी मुलगी त्याच्या घरी पोहोचली तेव्हा त्याच्या कुटुंबातील कुणीच घरी नव्हते. त्याचे दोन अल्पवयीन मित्र तिथे आलेले होते. त्याने मुलीला तुझ्या बोलायचं आहे म्हणून आतील एका खोलीत नेले. तिथेच आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.
अल्पवयीन मुले म्हणाली आम्ही व्हिडीओ बनवलाय
आरोपीने मुलीवर अत्याचार केल्यानंतर इतर दोन अल्पवयीन मुले त्या खोलीत गेली आणि मुलीला म्हणाली की आम्ही याचा व्हिडीओ बनवला आहे. आम्ही तो व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकी त्या दोघांनी दिली आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
भेटायला गेल्यानंतर अचानक घडलेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेने पीडिता हादरली. ती घरी आली आणि तिने तिच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. तिच्या कुटुंबातील व्यक्तींनी लगेच नंदनवन पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि झालेल्या प्रकाराची माहिती दिली.
पोलिसांनी पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर एका आरोपीला अटक केली, तर दोन विधिसंघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले. मुलांनी या कृत्याचा खरंच व्हिडीओ बनवला होता का, याचाही तपास पोलीस सध्या करत आहेत.