नागपूर : फाईव्ह स्टार हॉटेलमधील विकृत शेफविरोधात दुसरा गुन्हा; यापूर्वीही केलं होतं अश्लील कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 23:55 IST2025-03-12T23:52:25+5:302025-03-12T23:55:24+5:30
Nagpur Viral Video News: मिहानमधील तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव : न्यू एअरपोर्ट मेट्रो स्थानकाजवळ घटना घडली होती.

नागपूर : फाईव्ह स्टार हॉटेलमधील विकृत शेफविरोधात दुसरा गुन्हा; यापूर्वीही केलं होतं अश्लील कृत्य
-योगेश पांडे, नागपूर
वर्धा मार्गावर तरुणींसमोर अश्लील हावभाव केल्याच्या प्रकरणातील आरोपीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. मिहान परिसरात काम करणाऱ्या एका तरुणीसमोरदेखील न्यू एअरपोर्ट मेट्रो स्थानकाजवळ त्याने तसाच प्रकार केला होता. त्याच्या कुकृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर व ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यावर संबंधित तरुणीने त्याच्याविरोधात तक्रार केली. बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आरोपीचे नाव शांतकुमार असून, तो मूळचा कर्नाटक येथील गुलबर्गा येथील रहिवासी आहे. मागील काही काळापासून तो वर्धा मार्गावरील ली-मेरिडिअन या हॉटेलमध्ये कार्यरत होता. वर्धा मार्गावरील अजनी चौकाकडून रहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर त्याने किळसवाणा प्रकार केला होता व त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
आणखी एका तरुणीने तक्रार केली
तरुणींच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता व धंतोली पोलिस ठाण्याच्या पथकाने त्याला कारच्या क्रमांकावरून शोध घेत अटक केली होती. हा प्रकार समोर आल्यावर मिहान परिसरातील कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने बेलतरोडी पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार केली.
पार्किंगमध्ये असताना केले होते अश्लील कृत्य
आरोपीने मेट्रो स्थानकाच्या पार्किंगमध्ये सायंकाळच्या सुमारास घाणेरडे कृत्य केले होते. त्याने अनेकदा असा प्रकार केला होता, परंतु तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयाच्या परवानगीने त्याला पुन्हा ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती बेलतरोडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
शांतकुमार मानसिक विकृतच व्यक्ती
शांतकुमार विवाहित आहे परंतु त्याचे पत्नीशी फारसे पटत नाही. त्याच्यात मानसिक विकृती असून तो त्यातूनच अश्लील कृत्य करत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस त्याच्या कर्नाटकमधील कुटुंबियांकडूनदेखील त्याच्याबाबत माहिती घेत आहेत. त्याने शहरात आणखी ठिकाणीदेखील असे प्रकार केले आहे का हे त्याच्या चौकशीतून स्पष्ट होऊ शकेल.