नागपुरात शाळकरी मुलाला भरधाव वाहनाने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 21:55 IST2021-12-20T21:54:57+5:302021-12-20T21:55:26+5:30
Nagpur News शाळेतून घराकडे निघालेल्या चिमुकल्याला नागपुरात एका भरधाव वाहनचालकाने चिरडले. मोहम्मद अयान मोहम्मद इरफान (वय ८ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे.

नागपुरात शाळकरी मुलाला भरधाव वाहनाने चिरडले
नागपूर - शाळेतून घराकडे निघालेल्या चिमुकल्याला एका भरधाव वाहनचालकाने चिरडले. मोहम्मद अयान मोहम्मद इरफान (वय ८ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. सक्करदऱ्यातील परमात्मा हॉस्पिटल जवळच्या गल्लीत सोमवारी सकाळी ११.३० वाजता हा भीषण अपघात घडला. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
सक्करदऱ्यातील आझाद कॉलनी, झोपडपट्टीत राहणारा अयान सोमवारी सकाळी शाळेत गेला. ११.३० वाजता तो त्याच्या मित्रासोबत घराकडे परत येत होता. समोरून वेगात आलेल्या पाण्याच्या टँकरचा (टाटा ४०७ क्रमांक एमएच ४०- वाय १४७८) आरोपी चालक हमीद खान अब्बास खान (वय २४) याने निष्काळजीपणे वाहन चालवून मोहम्मद अयानला जोरदार धडक मारली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला खासगी इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातामुळे परिसरात काही वेळेसाठी तणाव निर्माण झाला. माहिती कळताच सक्करदरा पोलीस घटनास्थळी धावले. जरीब खान गफ्फार खान (वय २४) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी हमीद खानविरुद्ध गुन्हा दाखल केला.
परिसरात शोककळा
चिमुकल्या अयानची शाळा काही दिवसापूर्वीच सुरू झाली होती. कुडकुडत्या थंडीत तो आज सकाळी शाळेत गेला अन् घरी परत येत असताना त्याच्यावर काळाने झडप घातली. अयानचे वडील ऑटोचालक आहेत. त्यांना दोन मुले आहेत. अयानच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.