नागपूर ग्रामीणमधील आरोग्य व्यवस्थेला ‘बूस्ट’, कामठीतील शंभर खाटांच्या रुग्णालयासाठी सहा एकर जमीन

By योगेश पांडे | Updated: May 14, 2025 16:10 IST2025-05-14T16:10:19+5:302025-05-14T16:10:58+5:30

Nagpur : कन्हान, मोहपा, मोवाडमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे होणार ग्रामीण रुग्णालय

Nagpur rural health system to get a boost, six acres of land for a 100-bed hospital in Kamthi | नागपूर ग्रामीणमधील आरोग्य व्यवस्थेला ‘बूस्ट’, कामठीतील शंभर खाटांच्या रुग्णालयासाठी सहा एकर जमीन

Nagpur rural health system to get a boost, six acres of land for a 100-bed hospital in Kamthi

योगेश पांडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
राज्य शासनाने नागपूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. कामठीतील शंभर खाटांच्या रुग्णालयासाठी सहा एकर जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कन्हान, मोहपा, मोवाडमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याचेदेखील निश्चित करण्यात आले आहे.

मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ विनायक महामुनी, सिव्हील सर्जन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाच्या विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याची मागणी होती. नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पदमान्यता, नवीन शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जुन्या दवाखान्यांचे श्रेणीवर्धन करणे आवश्यक होते. त्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाली. कामठीत ५० खाटांचे रुग्णालय आहे. ते १०० खाटांचे करण्यात यावे. त्याच्या बांधकामासाठी ५ एकर जागेची आवश्यकता असून ती जागा उपलब्ध करुन देण्यात येईल असे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले. कन्हान, मोहपा, मोवाड या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन करुन ग्रामीण रुग्णालयामध्ये रुपांतर करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. उमरेड येथील ट्रॉमा केअर युनिटचा पदनिर्मिती प्रस्ताव, जिल्हा रुग्णालयास मंजूर ३५ कोटीचा निधी वितरीत करणे आणि डागा रुग्णालयास २० कोटीची आवश्यकता होती. त्यापैकी १३ कोटी रुपये मिळाले असून उर्वरित ७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधीही वितरीत करण्यात यावा यासाठी पावले उचलण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.

रुग्णालयांत पदभरतीचे संकेत
नागपूर जिल्ह्यामध्ये बांधण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयासाठी पदांची आवश्यकता होती. याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर आहार, सुरक्षा, वस्त्रधुलाई आणि स्वच्छता सेवा कंत्राटी पद्धतीने राबविण्याबाबतच्या प्रस्तावासही मंजूरी देण्यात आली आहे.

कुही येथे ५० खाटांचे रुग्णालय
ग्रामीण रुग्णालय कुही येथे सध्या ३० खाटांचे रुग्णालय असून त्याचे श्रेणीवर्धन करुन ते ५० खाटांचे करण्यात यावे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तसा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही महसूलमंत्र्यांनी दिले आहेत.

Web Title: Nagpur rural health system to get a boost, six acres of land for a 100-bed hospital in Kamthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.