Exclusive: ३ वर्षापूर्वीही दंगल भडकवण्याचा फहीमचा प्रयत्न; पोलिसांनी हाणून पाडला होता डाव
By नरेश डोंगरे | Updated: March 20, 2025 23:39 IST2025-03-20T23:27:54+5:302025-03-20T23:39:36+5:30
Nagpur Violence: जमा केला होता हजारोंचा मॉब, चिथावणी देत माथी भडकविण्याचा प्रयत्न

Exclusive: ३ वर्षापूर्वीही दंगल भडकवण्याचा फहीमचा प्रयत्न; पोलिसांनी हाणून पाडला होता डाव
नरेश डोंगरे
नागपूर - नागपूर येथील दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान याने तीन वर्षांपूर्वी सुद्धा अशीच जातीय दंगल पेटविण्याचा प्रयत्न केला होता. तासभरात हजारो लोक त्याने गोळा केले होते. मात्र पोलिसांनी त्यावेळी त्याचा प्रयत्न हाणून पाडला होता. तेव्हा फारशी कडक कारवाई न झाल्यामुळेच फहीम निर्ढावला अन् त्याने नागपूरला पुन्हा एकदा दंगलीच्या वणव्यात झोकण्याची हिंमत केली.
सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून देशभर ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहरात १७ मार्चला फहीम खानने जातीय दंगल घडवून आणली. अनेकांना त्याने चिथावणी दिल्यामुळेच बेभान दंगेखोरांनी दगडफेक, जाळपोळ, तोडफोड करतानाच महिला पोलिसांशी अश्लाघ्य वर्तन केले. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी फहीमच्या पापाचे खोदकाम सुरू केले. त्यातून तीन वर्षांपूर्वी त्याने केलेल्या पापाचे भूतही आता पुढे आले आहे. तेव्हाचे प्रकरण तत्कालीन नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याशी संबंधित होते. नुपूर शर्मा यांनी केलेल्या आक्षेपार्ह्य विधानानंतर निर्माण झालेल्या वातावरणात विष घोळून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न खानने केले होते.
फहीम खानने नुपूर यांच्याशी संबंधित एक क्लिप तयार करून ती विशिष्ट समुदायातील ठिकठिकाणच्या तरुणांना पाठवून हजारोंचा मॉब गोळा केला होता. या जमावाकडून कामठीमध्ये दंगलीचे पाप घडवून आणण्याचे मनसुबे होते. मात्र त्यावेळी पोलिसांचा प्रचंड ताफा पोहचला आणि जमावातील अनेकांना विश्वासात घेऊन तेव्हाच्या तेव्हा त्यांना शांत केले. त्यामुळे फहीम खान याचा जातीय दंगलीचा प्रयत्न फसला होता.
त्याचा 'तो' व्हिडिओ अन् साथीदार
तेव्हापासून फहीम खान छोट्या-मोठ्या कुरापती करत होता. यावेळी मात्र त्याने जातीय दंगल घडवून आणण्यात यश मिळवले. आता पोलिसांनी त्याच्या पापाचे खोदकाम चालविल्याने हे प्रकरणही पुढे आले आहे. जमावाच्या मध्ये फहीम खान चिथावणीखोर वक्तव्य करत असतानाचा एक व्हिडिओही पोलीस अधिकाऱ्यांना सापडला आहे. यात त्याचे काही साथीदारही सोबत आहेत. त्यामुळे फहीमच्या पुन्हा एका जुन्या पापाची लक्तरे पोलिसांकडून वेशीवर टांगली जाणार आहेत.