भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे एक निवृत्त पोलीस कर्मचारी ठार झाला. हरिराम पृथ्वीपाल यादव (वय ६८) असे मृताचे नाव आहे. ते मानकापुरातील रोज कॉलनीत राहत होते. गुरुवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने ट्रकचालकाची बेदम धुलाई करून वाहतूक रोखली होती.
नागपुरात निवृत्त पोलीस कर्मचारी अपघातात ठार
ठळक मुद्देभरधाव ट्रकची धडक : अवस्थीनगरात अपघात, प्रचंड तणाव
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे एक निवृत्त पोलीस कर्मचारी ठार झाला. हरिराम पृथ्वीपाल यादव (वय ६८) असे मृताचे नाव आहे. ते मानकापुरातील रोज कॉलनीत राहत होते. गुरुवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने ट्रकचालकाची बेदम धुलाई करून वाहतूक रोखली होती.हरिराम यादव पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर मानकापुरात स्थायीक झाले. त्यांचा राकेश नामक मुलगा गुन्हेशाखेत तर, दुसरा लकडगंज ठाण्यात पोलीस म्हणून कार्यरत आहे. घरगुती कामाच्या निमित्ताने यादव गुरुवारी दुपारी दुचाकीने घराबाहेर पडले. ते अवस्थीनगर रिंग रोडवरून जात होते. अचानक वळणावर त्यांना आयशर ट्रक (एमएच ०४/ जीआर २३१२) च्या चालकाने समोरून जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीचालक यादव जागीच गतप्राण झाले. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी भरदुपारी हा अपघात घडल्याने आजूबाजूच्यांनी धाव घेतली. त्यांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकचालक शेर बहादूर यादव याला पकडून त्याची बेदम धुलाई केली. काहींनी ट्रकवर दगडफेक केली. टँक फोडून आगही लावण्याचे प्रयत्न केले. मात्र काहींनी समंजसपणा दाखवल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, अपघातस्थळी प्रचंड गर्दी जमली होती. याचवेळी कॉग्रेसच्या संघर्ष यात्रेतील कार्यकर्ते तिकडून जात होते. त्यांनीही तेथे जमून जोरदार घोषणाबाजी केली. या मार्गावरची वाहतूक व्यवस्था चांगली करण्यात यावी, अशी मागणी करून वाहतूक रोखली. परिणामी तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला. अपघाताची माहिती कळताच मानकापूर तसेच गिट्टीखदान पोलिसांचे गस्ती पथक तसेच वाहतूक शाखेचे पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी संतप्त जमावाची कशीबशी समजूत काढली. तत्पूर्वी, जमावाच्या तावडीतून आरोपी ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले. नंतर गिट्टीखदान पोलिसांनी त्याला अटक केली.नेहमीच होतात अपघातवर्दळीचा मार्ग असूनही वाहतूक पोलीस सतर्कपणे काम करीत नसल्याने या भागातील वाहतूक कमालीची बेशिस्त झाली आहे. त्यामुळे नेहमीच अपघात होतात. संतप्त जमावाने हा मुद्दा लावून या भागात सिग्नल तसेच चौकात नेहमी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मागणीच्या पूर्ततेचे आश्वासन दिल्यामुळे तणाव निवळला.