नागपुरात सरासरीपेक्षा निम्म्याच पावसाची नोंद; तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता कमीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 16:05 IST2025-06-28T16:04:32+5:302025-06-28T16:05:20+5:30

बॅकलॉग वाढणार : विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस

Nagpur records half the average rainfall; Chances of heavy rain in three days are low | नागपुरात सरासरीपेक्षा निम्म्याच पावसाची नोंद; तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता कमीच

Nagpur records half the average rainfall; Chances of heavy rain in three days are low

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
जून महिना संपायला अवघे तीन दिवस उरले असतानाही, नागपूर शहरात या महिन्याच्या सरासरी पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ निम्म्याच म्हणजे ५० टक्केच पावसाची नोंद झाली आहे. येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याने, यावर्षी जूनमधील पावसाचा 'बॅकलॉग' वाढणार हे निश्चित आहे. नागपुरात आतापर्यंत ७५.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, याच कालावधीत सरासरी १४८.४ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो.


गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे विदर्भातील पावसाची सरासरी सुधारली आहे. विदर्भात आतापर्यंत १३०.६ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे, जो सरासरीपेक्षा १३ टक्के कमी आहे. या कालावधीत विदर्भात सरासरी १४९.७मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. हवामान विभागानुसार, बंगालच्या उपसागरात 'सायक्लोनिक सर्कुलेशन' सह कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम पुढील दोन दिवसांत मध्य भारताच्या आकाशात दिसू शकतो.


मध्य प्रदेशात तयार झालेल्या द्रोणिकेमुळे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आर्द्रता येत असून, त्यामुळे पाऊस पडत आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ३० जून ते २ जुलैदरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


केवळ हलक्या सरींवरच समाधान
नागपुरात शुक्रवारी सकाळपासूनच आकाश ढगाळ होते. अनेकदा ढगांची दाटी वाढली आणि आकाशात गडगडाटाचा आवाजही ऐकू आला, पण केवळ हलक्या सरींवरच समाधान मानावे लागले. गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे सकाळी ८:३० वाजेपर्यंत नागपुरात ६.४ मि.मी. पावसाची नोंद झाली.

Web Title: Nagpur records half the average rainfall; Chances of heavy rain in three days are low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर