Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
By निशांत वानखेडे | Updated: September 16, 2025 20:49 IST2025-09-16T20:46:35+5:302025-09-16T20:49:49+5:30
दिवसभर शांतता, सायंकाळी धुमाकूळ, तासभर धुवांधार : अनेक भागात साचले पाणी : चाकरमाण्यांची दाणादाण

The prediction came true! Heavy rains lashed Nagpur; How many more days will it rain like this?
Nagpur Rains : साेमवारप्रमाणे मंगळवारीही नागपूरकरांनी मुसळधार पावसाचे भयावह रूप पुन्हा अनुभवले. दिवसभर शांत राहिलेल्या काळ्या ढगांमधून सायंकाळी मुसळधार सरी बरसल्या. साेबत मेघगर्जनेसह विजांच्या प्रचंड कडकडाटाने नागरिकांना चांगलीच धडकी भरली. पावसाची तीव्रता आजही जबरदस्त होती. जवळपास तासभर धो-धो पावसाचे थैमान सुरू राहिले. रस्त्यावर तलावासारखे पाणी साचल्याने वाहतुकीचा फज्जा उडाला व जनजीवन विस्कळीत झाले.
हवामान विभागाने १५ व १६ सप्टेंबरला नागपुरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला हाेता. त्यानुसार साेमवारी दुपारी भीतीदायक पाऊस बरसला. पावसाचा जाेर रात्रीही कायम हाेता. मंगळवार सकाळपर्यंत २४ तासात शहरात ५५.६ मि.मी. पावसाची नाेंद करण्यात आली. सकाळपासूनही ढगाळ वातावरण कायम हाेते. मध्यमध्ये ढगांचे रुपही काळेकुट्ट झाले हाेते पण पावसाने शांतता बाळगली हाेती. मात्र सायंकाळी ५ पासून वातावरण बदलले.
५.३० वाजता रिमझिम सरींसह पाऊस सुरू झाला. मात्र ६ वाजता पावसाची तीव्रता प्रचंड वाढली. जाेरदार गर्जन व विजांच्या कडकडाटासह धाे-धाे पाऊस बरसला. ही काेसळधार जवळपास तासभर सुरू हाेती. त्यानंतर जाेर कमी झाला पण मध्यम पावसाची रिमझिम सुरू राहिली. विशेष म्हणजे ऐन सुटीच्या वेळी जाेरदार पाऊस बरसल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली. वादळासह पाऊस असल्याने रेनकाेटही तग धरू शकत नव्हते. त्यामुळे चाकरमाण्यांना घराकडे निघणे शक्य झाले नाही. जे निघाले ते रस्त्यात अडकले व बरेच भिजले.
अनेक रस्ते, वस्त्या जलमय
क्षणात आलेले जाेर‘धार’ पावसामुळे शहरातील बहुतेक रस्ते जलमय झाले हाेते. सीताबर्डी, नरेंद्रनगर, नरेंद्रनगरचा पूल, त्रिमूर्तीनगर, गाेपालनगर, गाेपालनगर बसस्टँड, धंताेली, काेराडी राेड परिसरातील रस्त्यावर नेहमीप्रमाणे तलाव झाले हाेते. त्यामुळे वाहतुकीचा प्रचंड खाेळंबा निर्माण झाला. शहरातील व लगतच्या सखल भागातील वस्त्यांमध्येही पाणी शिरले हाेते.
पाऊस राहिल पण जाेर कमी
हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या २२ सप्टेंबरपर्यंत नागपूरसहविदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पावसाळी वातावरण कायम राहणार आहे. मात्र त्याचा जाेर कमी असेल.
दाेन तासात ५०.६ मि.मी. नाेंद
दिवसभर ढग शांत असल्याने सायंकाळपर्यंत पावसाची नाेंद झाली नाही. मात्र सायंकाळी ६ वाजतापासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला हाेता. तासभर धाे-धाे जलधारा बरसल्या. त्यानंतर मध्यम पावसाची रिमझिम चालली हाेती. रात्री ८.३० वाजतापर्यंत शहरात ५०.६ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला.