नागपूर रेल्वे स्थानकात पाणीच पाणी; रस्ते बुडाले, बंद वाहतूक

By शुभांगी काळमेघ | Updated: July 9, 2025 15:10 IST2025-07-09T15:10:00+5:302025-07-09T15:10:37+5:30

रेलगाड्या थांबल्या, घरं बुडाली : नागपूरमध्ये पावसाचा हाहाकार

Nagpur railway station flooded; roads submerged, traffic closed | नागपूर रेल्वे स्थानकात पाणीच पाणी; रस्ते बुडाले, बंद वाहतूक

Nagpur railway station flooded; roads submerged, traffic closed

नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात सुरु असलेल्या जोरदार पावसाने नागपूर शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. विशेषतः मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले असून नागपूर रेल्वे स्थानकातही पाणी साचले आहे. 


रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. १ आणि २ वर पाणी साचले असून प्रवाशांना चिखल आणि साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. काही गाड्यांना उशीर झाला, काही गाड्यांचे रूट बदलले तर काही वेळेस गाड्यांना थांबवावं लागलं. त्यामुळे हजारो प्रवाशांना समस्येला सामोरे जावे लागत आहे. स्टेशन परिसरातल्या दुकानांमध्ये पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.


शहराच्या विविध भागांमध्ये जसे की शंकरनगर, धरमपेठ, रमन विज्ञान केंद्राजवळ आणि झिंगाबाई टाकळी भागात  रस्ते, घरांचे तळमजले, आणि सोसायट्यांची पार्किंग पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. अग्निशमन दल आणि नागपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पाणी उपसण्याचे प्रयत्न सुरु आहेत, मात्र मुसळधार पावसामुळे ही कामे करतांना अडचण येत आहे.


महापालिकेकडून सांगण्यात आलं की, शहरात जवळपास २० ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या असून काही भागात वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. नागपूरच्या सखल भागात विशेषतः मानकापूर, बुटीबोरी आणि इतर उपनगरांमध्ये नागरिकांना हलवण्यासाठी बोटीद्वारे बचावकार्य करण्यात येत आहे.


भारतीय हवामान खात्याने नागपूरसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून अजून काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. शहरात आतापर्यंत २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.


 

Web Title: Nagpur railway station flooded; roads submerged, traffic closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.