नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:46 IST2025-08-27T16:45:42+5:302025-08-27T16:46:31+5:30
भूखंड माफियांचे कोट्यवधींच्या फसवणुकीचे रॅकेट : वाठोडा ठाण्याची कारवाई

Nagpur: Police catch mastermind with the help of 'Chat GPT'; Loan taken on Pune person's house, Rs 5 crore fraud
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट नोंदणीच्या आधारे गृहकर्ज घेऊन बँकांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. पोलिसांनी 'एआय'च्या मदतीने सूत्रधारासह पाच जणांना अटक केली आहे. आतापर्यंत पाच कोटींच्या फसवणुकीची प्रकरणे समोर आली असली तरी या टोळीने अनेकांना गंडा घातल्याची शक्यता असल्याने हा आकडा वाढू शकतो. वाठोडा पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती परिमंडळ चारच्या उपायुक्त रश्मिता राव यांनी दिली.
या प्रकरणात नीलेश मनोहर पौनीकर (३१, न्यू डायमंडनगर, नंदनवन) हा सूत्रधार असून संदीप चांदराव निंभोरकर (३६, विनायकनगर, हुडकेश्वर), इशान बळीराम वाटकर (३७, वाठोडा), इम्रान अली अख्तर अली हाश्मी (४६, आर्यनगर, जरीपटका) आणि अजय वामनराव पाठराबे (४१, भारत माता चौक, रेशमओळी, इतवारी) हे आरोपी आहेत. व्यापारी धनंजय जैन यांचे पुण्यातील नातेवाईक नीरज सोईतकर यांचा खरबी येथे फ्लॅट होता. नीरज यांनी फ्लॅट विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली होती. धनंजय खरेदीदारांना फ्लॅट दाखवत असे. नीलेश आणि संदीप यांनी धनंजय यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी फ्लॅट खरेदी करण्याचे आमिष दाखवून मूळ कागदपत्रांची झेरॉक्स काढली. इम्रानने फ्लॅटची बनावट रजिस्ट्री तयार केली. यामध्ये फ्लॅटचा मूळ मालक सोईतकरऐवजी अजय पाठराबेचा फोटो लावण्यात आला. सोईतकर यांच्या नावाने पाठराबे याचे बनावट आधार आणि पॅन कार्ड बनवण्यात आले. नागपूर नागरिक सहकारी बँकेत सोईतकर यांच्या नावाने खातेही उघडण्यात आले. त्या फ्लॅटची इशान वाटकर याच्या नावावर रजिस्ट्री करण्यात आली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बनावट रजिस्ट्री गहाण ठेवून इशानने ३० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले. कर्जाची रक्कम सोईतकर यांच्या नावाने उघडलेल्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली. ही रक्कम त्यानंतर आरोपींनी वाटून घेतली. फसवणुकीची माहिती मिळताच सोईतकर यांच्या वतीने धनंजय जैन यांनी वाठोडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांना या रॅकेटची माहिती मिळाली. वाठोडा पोलिसांनी या रॅकेटपर्यंत पोहोचण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला. सोशल मीडियावरून पोलिसांना नीलेशच्या कुटुंबाची माहिती मिळाली. मुलाचा फोटो मिळाल्यावर त्यांना गणवेशावरून त्याचा शाळेचा पत्ता सापडला. त्यामुळे नीलेशपर्यंत पोहोचणे सोपे झाले. ही कारवाई पोलिस उपायुक्त रश्मिता राव, सहायक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हरीश बुराडे, अमोल पाटील, सचिन ठाकरे, प्रणाली बेनके, कैलाश श्रावणकर यांच्या पथकाने केली.
हप्ते थकल्याने समोर आला गैरप्रकार
बनावट खरेदीदार उभा करीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या हप्ते थकल्याने बँकेने घर गाठल्यानंतर या फसवणुकीचा उलगडा झाला. अशाच पद्धतीने या टोळीने शहरात ११ ठिकाणी बनावट खरेदीदार आणि विक्रेता उभा करीत बँकांची ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे आतापर्यंत केलेल्या तपासातून निष्पन्न झाले आहे. त्यांनी आणखी किती जणांची फसवणूक केली, याचा शोध घेतला जात असल्याची माहिती रश्मिता राव यांनी दिली.