CoronaVirus in Nagpur :नागपुरात आता पोलीसही कोरोनाच्या विळख्यात : तीन पोलिसांसह पाच पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 00:10 IST2020-05-16T23:26:10+5:302020-05-17T00:10:55+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेणाऱ्या पोलिसांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरल्याने खळबळ उडाली. तीन पोलिसांचा नमुना पॉझिटिव्ह आला. धक्कादायक म्हणजे, हे तिन्ही मोमीनपुरा येथे कर्तव्य बजावत होते.

In Nagpur, the police are now in the grip of corona: five positives including three policemen | CoronaVirus in Nagpur :नागपुरात आता पोलीसही कोरोनाच्या विळख्यात : तीन पोलिसांसह पाच पॉझिटिव्ह

CoronaVirus in Nagpur :नागपुरात आता पोलीसही कोरोनाच्या विळख्यात : तीन पोलिसांसह पाच पॉझिटिव्ह

ठळक मुद्देरुग्णसंख्या ३४१ : कोरोनाचा पाचवा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेणाऱ्या पोलिसांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरल्याने खळबळ उडाली. तीन पोलिसांचा नमुना पॉझिटिव्ह आला. धक्कादायक म्हणजे, हे तिन्ही मोमीनपुरा येथे कर्तव्य बजावत होते. या रुग्णांसह आणखी दोन महिला पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ३४१ झाली आहे. आज पुन्हा एका रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली. नागपुरात मृतांची संख्या पाच झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस कन्टेटमेंट वसाहतीमध्ये कर्तव्य बजावत आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदतही करीत आहेत. या दरम्यान कोरोनाच्या विळख्यात ते कधी आले हे त्यांनाही कळले नाही. १५ मे रोजी जेव्हा मोमीनपुरा येथे मनपाच्या आरोग्य विभागाचे नमुने तपासणीचे शिबिर लागले तेव्हा यांनीही आपला नमुना दिला.
माफसू प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले या तिघांचेही नमुने पॉझिटिव्ह आले. यातील एक तहसील पोलीस ठाण्याच्या पथकात, एक नियंत्रण कक्षात तर तिसरा पोलीस मुख्यालयात नियुक्तीला आहे. यातील एक गोरेवाडा येथील हरीहोमनगर, कामठी रोड येथील तर तिसरा राज्य राखीव पोलीस दलाच्या वसाहतीत राहतो. या तिन्ही पोलिसांना रात्री मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, या तिन्ही वसाहती आरोग्य नियंत्रणासाठी नव्या आहेत. यातच हे पोलीस कर्मचारी तैनात असल्याने संपर्कात आलेले पोलीस त्यांचे कुटुंब क्वारंटाईन होण्याची शक्यता आहे. सध्याच्या स्थितीत ३० ते ३५ पोलिसांंना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आहे.

जवाहरनगरातील दोन महिला पॉझिटिव्ह
जवाहरनगरातील पहिल्या ५५ वर्षीय ‘सारी’ व कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील नातेवाईक निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला होता. परंतु त्यांच्या इमारतीत राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकाचे नमुने तपासले असता यातील ३४ व २५ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आल्याने यंत्रणेवर कामाचा भार वाढला आहे. या दोन्ही महिला ‘व्हीएनआयटी’मध्ये क्वारंटाईन होत्या. त्यांना रात्री मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले.

सारी व कोविड पॉझिटिव्ह रुग्णाचा दुसरा मृत्यू
सारी व कोविड पॉझिटिव्ह असलेल्या गड्डीगोदाम खलाशी नगर येथील ६५ वर्षीय रुग्णाचा मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या रुग्णाला ‘सारी’चा रुग्ण म्हणून १३ मे रोजी मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. सुरुवातीपासून प्रकृती गंभीर होती. गुरुवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री १.३० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सारी कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा हा दुसरा मृत्यू आहे. पहिला मृत्यू ११ मे रोजी पांढराबोडी येथील ६५ वर्षीय रुग्णाचा झाला होता.

पाच रुग्ण कोरोनामुक्त
मेयोमधून पाच रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. विशेष म्हणजे, या पाचही रुग्णांचे नमुने १४व्या दिवशी पॉझिटिव्ह आले होते. यामुळे पुन्हा त्यांच्यावर पाच दिवस उपचार करण्यात आले. गेल्या २४ तासाच्या अंतराने तपासण्यात आलेले दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. यात १० वर्षीय मुलगा, ६२ व ७० वर्षीय पुरुष आणि २८ व ४० वर्षीय महिलेचा समावेश आहे. हे पाचही रुग्ण सतरंजीपुरा येथील रहिवासी आहे. नागपुरात आतापर्यंत १९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ७७
दैनिक तपासणी नमुने ११६
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ३४१
नागपुरातील मृत्यू ०५
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण १९८
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २००४
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १५९१
पीडित-३४१-दुरुस्त-१९८-मृत्यू-५

Web Title: In Nagpur, the police are now in the grip of corona: five positives including three policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.