Nagpur: पायटलचे ट्रेनिंग; मात्र विमानच उडवायला मिळाले नाही, नागपूर फ्लाईंग क्लबची मनमानी
By नरेश डोंगरे | Updated: October 3, 2024 22:45 IST2024-10-03T22:44:34+5:302024-10-03T22:45:11+5:30
Nagpur News: महाज्योतीची परीक्षा उत्तीर्ण करून नागपूर फ्लाईंग क्लबमध्ये दोन वर्षांचे पायलट प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानच उडवू देण्यात आले नाही. त्यामुळे या १४ विद्यार्थ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला असून, मंडपाला भेट देणाऱ्यांना ते आपली व्यथा ऐकवत आहेत.

Nagpur: पायटलचे ट्रेनिंग; मात्र विमानच उडवायला मिळाले नाही, नागपूर फ्लाईंग क्लबची मनमानी
- नरेश डोंगरे
नागपूर - महाज्योतीची परीक्षा उत्तीर्ण करून नागपूर फ्लाईंग क्लबमध्ये दोन वर्षांचे पायलट प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानच उडवू देण्यात आले नाही. त्यामुळे या १४ विद्यार्थ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला असून, मंडपाला भेट देणाऱ्यांना ते आपली व्यथा ऐकवत आहेत.
पायलट प्रशिक्षण अर्थात विमान उडविण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्याला २०० तास विमान उडविण्याचा अनुभव असेल तरच त्याला कमर्शियल पायलट लायसेन्स (सीपीएल) मिळते. याच लायसन्सच्या आधारे तो नोकरीस पात्र ठरतो. महाज्योतीकडून सीपीएल कोर्सकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण ठरलेल्या २० विद्यार्थ्यांनी २ नोव्हेंबर २०२२ ला नागपूर फ्लाईंग क्लबमध्ये पायलट प्रशिक्षण सुरू केले. १८ महिन्यांचे हे प्रशिक्षण आहे. त्यात २०० तास विमान उडविणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थ्याला हा अनुभव असला तरच त्याचा सीपीएल कोर्स पूर्ण होतो आणि नंतरच त्याला नोकरी मिळते. मात्र, गेल्या २३ महिन्यांत या प्रशिक्षणार्थ्यांना विमान उडविण्याचे प्रशिक्षण फारच कमी वेळा देण्यात आले. नागपूर फ्लाईंग क्लबचे विश्वस्त विभागीय आयुक्त, महाज्योती, विद्यार्थी आणि पालकांची या संबंधाने अनेकदा बैठक झाली. मात्र, आवश्यक तासांचे उड्डाण झालेच नाही.
विशेष म्हणजे, हेच प्रशिक्षण खासगी संस्थेत एक वर्षाचे असते. नागपूर फ्लाईंग क्लब २३ महिन्यातही ते पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून त्यांनी संविधान चाैकात आमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. आपली व्यथा सांगतानाच या प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्याला दुसऱ्या फ्लाईंग क्लबकडून प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
२३ महिन्यात कुणी किती तास उडविले विमान?
अविनाश येरणे, शुभम गोसावी, स्वप्निल चव्हाण (तिघांनीही शून्य तास), रोहित बेडवाल (१ तास), विनय भांडेकर (३ तास), सानिका निमजे (६ तास), भक्ती पाटील (११ तास), जयेश देशमुख (१५ तास), तेजस बडवार (१५ तास), ऋतुंबरा देवकाते (१६ तास), हार्दिका गोंधळे (२० तास) विश्वनाथ जाधव (२५ तास), प्रणव साखरकर (२८ तास) आणि स्नेहल खैरनार (३५ तास)
शासन दखल घेणार का?
२०० तास विमान उडविण्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्याशिवाय प्रशिक्षणार्थ्याला नोकरी मिळू शकत नाही. आता या १४ विद्यार्थ्यांची दोन वर्षे वाया गेली. त्यांना प्रशिक्षणच मिळाले नसल्याने नोकरी कोण देणार, असा प्रश्न ओबीसी युवा अधिकार मंचाचे संयोजक उमेश कोराम यांनी केला आहे. सरकार याची दखल घेणार का, असाही प्रश्न कोराम यांनी उपस्थित केला आहे.