नागपुरात भाजप जाहीरनाम्यासाठी जनतेकडून मागविणार सूचना
By योगेश पांडे | Updated: December 22, 2025 21:47 IST2025-12-22T21:46:50+5:302025-12-22T21:47:51+5:30
Nagpur Municipal Corporation Election 2026: महानगरपालिका निवडणूकीत उमेदवारांची नावे अंतिम करण्यात व्यस्त असलेल्या भाजपकडून जाहीरनाम्याचीदेखील तयारी सुरू झाली आहे. जाहीरनामा तयार करताना पक्षाकडून जनतेकडूनदेखील सूचना मागविण्यात येत आहे. त्यासाठी सोशल माध्यमे व ऑनलाईन लिंकची मदत घेण्यात येणार आहे.

नागपुरात भाजप जाहीरनाम्यासाठी जनतेकडून मागविणार सूचना
- योेगेश पांडे
नागपूर - महानगरपालिका निवडणूकीत उमेदवारांची नावे अंतिम करण्यात व्यस्त असलेल्या भाजपकडून जाहीरनाम्याचीदेखील तयारी सुरू झाली आहे. जाहीरनामा तयार करताना पक्षाकडून जनतेकडूनदेखील सूचना मागविण्यात येत आहे. त्यासाठी सोशल माध्यमे व ऑनलाईन लिंकची मदत घेण्यात येणार आहे.
नागरिकांच्या अपेक्षांना प्राधान्य देणारा जाहीरनामा तयार करण्यात यावा अशा सूचना वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्या आहे. त्यादृष्टीने भाजपने व्यापक पातळीवर नियोजन सुरू केले आहे. पक्षाच्या धोरणांवर आधारित न राहता थेट जनतेच्या सूचनांवर जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांच्या समस्या, अपेक्षा, सूचना आणि विकासासंबंधी कल्पना जाणून घेण्यासाठी भाजपकडून सोशल माध्यमे तसेच ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून थेट लोकांशी संवाद साधण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र ऑनलाईन फॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार असून नागरिकांना आपली मते, तक्रारी व सूचना मांडता येणार आहेत.
जाहीरनाम्यात पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक कोंडी, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शिक्षण, महिला सुरक्षा, युवकांसाठी रोजगार, झोपडपट्टी पुनर्विकास, हरित नागपूर, स्मार्ट सिटी प्रकल्पांचा वेग, डिजिटल सुविधा आदी मुद्द्यांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे पक्ष सूत्रांकडून सांगण्यात आले. याशिवाय, स्थानिक पातळीवरील प्रभागनिहाय समस्यांचाही जाहीरनाम्यात समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
भाजपच्या शहर व जिल्हा नेतृत्वाकडून यासाठी स्वतंत्र समिती गठीत करण्यात येणार असून, प्राप्त सूचनांचे संकलन करून त्यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर निवडणूक जाहीरनाम्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल. जाहीरनाम्याला सर्वसमावेश रूप देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.