दसऱ्याच्या दिवशी नागपूर मेट्रो मध्यरात्रीपर्यंत धावणार ; 'या' मेट्रो स्थानकांवर राहील विशेष लक्ष
By शुभांगी काळमेघ | Updated: October 1, 2025 20:25 IST2025-10-01T20:23:51+5:302025-10-01T20:25:07+5:30
Nagpur : दीक्षाभूमी आणि रावण दहन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठी सोय

Nagpur Metro will run till midnight on Dussehra day; Special attention will be paid to 'these' metro stations
नागपूर : दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमेट्रोने आपल्या सेवा वेळेत वाढ तसेच प्रवास भाड्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. २ ऑक्टोबर रोजी, विजयादशमीच्या दिवशी मेट्रो मध्यरात्री १२ वाजेपर्यंत प्रवासी सेवा देणार आहे, अशी माहिती महा मेट्रो प्रशासनाने दिली आहे.
गर्दीचा अंदाज लक्षात घेऊन निर्णय
या दिवशी दीक्षाभूमी, कस्तुरचंद पार्क, रावण दहन स्थळे आणि इतर प्रमुख ठिकाणी हजारो नागरिक जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेता, मेट्रोने हे पाऊल उचलले आहे. सर्व मेट्रो स्थानकांवरून खापरी, प्रजापती नगर, लोकमान्य नगर आणि ऑटोमोटिव्ह स्क्वेअर मेट्रो सेवा सकाळी ५ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहील.
प्रवाशांना ३०% सवलत
दसऱ्याचा दिवस सरकारी सुट्टीचा असल्यामुळे प्रवाशांना मेट्रो भाड्यावर ३० टक्के सवलत देखील दिली जाणार आहे. ही सवलत सर्व प्रवाशांसाठी लागू असेल आणि ती वन टाइम टिकीट व कार्ड वापरणाऱ्यांनाही मिळेल, अशी माहिती महा मेट्रोने दिली.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
प्रशासनाने नागरिकांना खासगी वाहनांऐवजी मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून शहरातील वाहतूक सुरळीत राहील आणि प्रदूषणही कमी होईल. त्याचप्रमाणे, मेट्रो स्थानकांवर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता प्रवाशांनी वेळेआधी स्थानकांवर पोहोचावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.