In Nagpur Metro vehicle crushed labor | नागपुरात मेट्रोच्या वाहनाने मजुरास चिरडले
नागपुरात मेट्रोच्या वाहनाने मजुरास चिरडले

ठळक मुद्देथोडक्यात वाचले इतर साथीदार : राहाटे चौकातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पातील काँक्रिट मिक्सरच्या वाहनाने एका मजुराचा मृत्यू झाला. या अपघातात इतर चार मजूर थोडक्यात बचावले. बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे प्रकल्पाशी संंबंधित मजूर हादरले आहेत. दुखू बुधू गोराईत (३१) रा. पुरुलिया, पश्चिम बंगाल असे मृत मजुराचे नाव आहे.
वर्धा रोडवरील राहाटे कॉलनी चौकात मेट्रो रेल्वे स्टेशनचे काम सुरू आहे. दुखू आणि त्याचे साथीदार मंगळवारी रात्री येथे काम करीत होते. मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत काम चालत होते. काम संपल्यानंतर दुखू आपल्या साथीदारासह काम सुरू असलेल्या ठिकाणीच झोपला. पहाटे ३.४५ वाजता काँक्रिट मिक्सर वाहन क्रमांक एमएम ४०/बी.जी./८१३७ चा चालक गाडी रिव्हर्स घेत होता. दुखू गाडीखाली आला. इतर मजूर आवाज ऐकताच पळाले. दुखूचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कंत्राटदार आणि मेट्रो प्रकल्पातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. धंतोली पोलिसांना सूचना देण्यात आली.
सूत्रानुसार दुखू आणि त्याचे साथीदार मेट्रो पुलाखाली एका सुरक्षित जागेवर झोपले होते. काँक्रिट मिक्सर रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा करण्यात आला. गाडी रिव्हर्स घेत असताना कंडक्टर किंवा सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यत आले नव्हते. त्यामुळे चालकास मजूर झोपले असल्याचे त्याला माहिती पडले नाही. आवाज झाला नसता तर दुखूसह त्याच्या साथीदारांनाही जीव गमवावा लागला असता. ही घटना दाबण्यासाठी घटनास्थळी उपस्थित लोकांची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मजुरांशी बोलण्याबाबतही मनाई करण्यात आली आहे.
दुखूचे कुटुंबीय पश्चिम बंगालमध्ये राहतात. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर उपाशी मरण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन दिवसात मेट्रो प्रकल्पातील हा दुसरा अपघात आहे. सोमवारी सेंट्रल एव्हेन्यूवरील टेलिफोन एक्सचेंजजवळ प्रशांत सोनटक्के याला मनपा वाहनाने चिरडले होते. या अपघातात लकडगंज पोलिसांनी वाहन चालक आणि बीएसएनएल ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मेट्रोचे काम सुरू असल्याने तेथील रस्ता अरुंद झाला आहे. बीएसएनएलद्वारा खड्ड्यातून काढलेल्या मातीवरून घसरल्याने प्रशांत गाडीखाली आला होता.
तीन दिवसात सहा मृत्यू
तीन दिवसात रस्ते अपघातात एका तरुणीसह सहा लोकांचा जीव गेला. या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत परसली आहे. वाहतूक डीसीपी गजानन राजमाने वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कडक पाऊल उचलत आहेत. यासाठी अवैध प्रवासी वाहने आणि बुलेट चालकाविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक विभागाने या अपघातांना गांभीर्याने घेतले आहे.
टँकर पलटला, चालकाचा मृत्यू
केमिकलचा टँकर पलटल्याने चालकाचा मृत्यू झाला. सुरेंद्र येडपाचे (४८) रा. नीलडोह असे मृताचे नाव आहे. सुरेंद्र बुधवारी सकाळी केमिकलचा टँकर घेऊन एमआयडीसीतील अमरनगर येथून जात होते. नियंत्रण सुटल्याने टँकर पलटला. यात सुरेंद्र गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

साईट अभियंता निलंबित

 घटनेचे गांभीर्य पाहता एनसीसी व्यवस्थापनाने बेजबाबदारीच्या कारणाने साईट अभियंता राजीव झा याला निलंबित केले आहे. या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना महामेट्रो प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एनसीसी कंपनीने मृताच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची अंतरिम मदत केली आहे. आवश्यक कागदपत्रांच्या प्रकियेनंतर आणखी मदत करण्यात येणार आहे.


Web Title: In Nagpur Metro vehicle crushed labor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.