नागपूर मेट्रोने ओलांडला १० कोटी प्रवासी संख्येचा आकडा!
By मोरेश्वर मानापुरे | Updated: July 16, 2025 19:56 IST2025-07-16T19:55:21+5:302025-07-16T19:56:11+5:30
Nagpur : लोकांचा सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वास वाढला

Nagpur Metro crosses 100 million passenger mark!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोच्यानागपूरमेट्रोने १० कोटींचा प्रवासी संख्येचा आकडा ओलांडला असून ही कंपनीसाठी महत्त्वाची उपलब्धी आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमानेच ही उल्लेखनीय कामगिरी केल्याचे कंपनीचे मत आहे. प्रवासी संख्येत दरवर्षी लक्षणीय वाढ होत आहे. शहरी वाहतुकीच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. लोकांचा सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वास वाढला आहे.
नागपूर मेट्रोने २०१८-१९ या पहिल्या वर्षांत ५५ हजार, २०१९-२० मध्ये ९ लाख, २०२०-२१ मध्ये १९ लाख, २०२१-२२ मध्ये ६७ लाख, २०२२-२३ मध्ये २.३ कोटी, २०२३-२४ मध्ये २.५५ कोटी, २०२४-२५ मध्ये ३.१६ कोटी आणि २०२५-२६ मध्ये १५ जुलैपर्यंत ९२ लाखांचा प्रवासी संख्येचा आकडा ओलांडला. नागपूर मेट्रोची ही कामगिरी विविध योजनांमुळे शक्य झाली. या प्रवासी संख्येत २० टक्के विद्यार्थ्यांचा वाटा आहे. पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना महाकार्डवर ३० टक्के सवलत आणि १०० रुपयांत दररोज अमर्याद प्रवासाची सुविधा आहे. मेट्रोने १ जानेवारी २०२३ रोजी विक्रमी २.२ लाख प्रवासी संख्या नोंदवली होती, हे विशेष. नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन टप्प्याटप्प्याने करण्यात आले. संपूर्ण प्रकल्प ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूरकरांच्या सेवेत समर्पित झाला.